दिल्ली येथील साहित्य संमेलनात राजन लाखे यांचा विशेष सन्मान’कवी कट्टा प्रमुख’ पदाचे दशक पूर्ण

0
16

पिंपरी दि. 2 ( पीसीबी )
दिल्लीत संपन्न झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राजन लाखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

राजन लाखे हे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखेचे अध्यक्ष असून पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून लोकप्रिय असलेला कविकट्ट्याच्या प्रमुखपदाचा मान त्यांना आजतागायत म्हणजे आत्ताच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापर्यंत, गेली १० वर्षे सातत्याने मिळाला आहे. हा संमेलनाच्या इतिहासातील विक्रम आहे. यासाठी डॉ. पी. डी. पाटील, महामंडळाचे सदस्य प्रा. मिलिंद जोशी, प्रदीप दाते यांचे सहकार्य मिळाले, असे लाखे म्हणाले.

गेली १० वर्षे कवी कट्टाचे नियोजन करून आजपर्यंत त्यांनी ५००० च्या वर कवींना कविकट्टा व्यासपीठ उपलब्ध करून देऊन सदर व्यासपीठावर कविता सादरीकरणाची संधी दिलेली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखेच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार, प्रसार तसेच असंख्य साहित्यिक उपक्रम राबवून महाराष्ट्राच्या नकाशावर पिंपरी – चिंचवडचे नाव साहित्य शहर म्हणून नोंदवण्याचा बहुमान मिळवला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पिंपरी – चिंचवडमध्ये त्यांनी घेतलेले उपक्रम, मराठी प्राध्यापकांचा परिसंवाद, मेळावा, दिल्लीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली २०१८ साली केलेल्या आंदोलनातील सहभाग, पंतप्रधानांना पिंपरी – चिंचवडमधील साहित्यिकांची पत्रे पाठवण्यामध्ये घेतलेला पुढाकार या सर्व बाबींमुळे आणि त्यांनी सातत्याने राबवलेल्या विविध साहित्यिक उपक्रमांमुळे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी- चिंचवड शाखेला महाराष्ट्रातून दोनदा ‘उत्कृष्ट शाखा’ म्हणून गौरवण्यात आले आहे; आणि दोनदा हा पुरस्कार मिळवणारी ही एकमेव साहित्य शाखा आहे.

राजन लाखे यांच्या ‘शान्ता शेळके जन्म शताब्दी ग्रंथ : बकुळगंध’ या पुस्तकास अनेक पुरस्कार मिळाले असून हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बी. ए. च्या अभ्यासक्रमात लागले आहे, हे उल्लेखनीय आहे.