सुरक्षित आणि अपराधमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे, दि . २८ ( पीसीबी )– पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनाविषयी नाराजी आणि असंतोष दिसून येत आहे. घरफोडी, लुटमार, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, महिलांविरोधातील अत्याचार आणि किशोरवयीन गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवणे गरजेचे आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार , पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त श्री विनय चोबे आणि पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री पंकज देशमुख यांना पत्राद्वारे निर्देश दिले असून, नागरिकांच्या मदतीने प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांसोबत अधिक समन्वय साधून कार्य करावे, तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सूचित केले आहे.
पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांसोबत नियमित बैठका घेऊन त्यांचे प्रश्न आणि सूचना ऐकाव्यात, स्थानिक दक्षता समित्यांना अधिक सक्रिय करून स्थानिकांचा पोलिसांच्या कामकाजात सहभाग वाढवावा तसेच शाळा, महाविद्यालये आणि समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षाविषयक जनजागृती शिबिरे आयोजित करावीत, युवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्यांना पोलीस मित्र, होमगार्ड आणि सुरक्षा रक्षक म्हणून कार्य करण्यासाठी प्रेरित करावे.
नागरिकांनी पोलिसांशी थेट संवाद साधता यावा यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, हेल्पलाईन आणि मोबाइल अॅप्सचा अधिक चांगला वापर करण्याची गरज असल्याचेही डाॅ. गोऱ्हे यांनी सांगितले. गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘वॉच डॉग’ प्रणाली सुरू करून नागरिकांना संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच, महिला आणि वृद्धांसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सीसीटीव्ही नेटवर्क वाढवून सार्वजनिक ठिकाणी अधिक कॅमेरे बसवावेत, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी पारदर्शक प्रणाली विकसित करावी, असेही त्यांनी सुचवले आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि संशयास्पद व्यक्तींबद्दल माहिती देण्यासाठी पुढे यावे, यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवावी, अशी सूचनाही डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
पोलीस प्रशासनाने तातडीने या उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी लोकसहभाग वाढवावा, असे आदेश डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. “सुरक्षित आणि अपराधमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.