गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा तातडिने खुलासा

0
6

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ती पीडित तरुणी ओरडली का नाही? असा प्रश्न योगेश कदम यांनी उपस्थित केल्यावर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या मंत्र्यांना संवेदनशील प्रकरणात बोलताना जपून वक्तव्य करण्याचे म्हटले आहे. तसेच योगेश कदम यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपले नेमके वक्तव्य काय होते? आपला हेतू काय होता? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

योगेश कदम काय म्हणाले
आमचे सरकार लाडक्या बहिणींचे सरकार आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आमचे सरकार संवेदनशील आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाबाबत मी प्रत्येक बैठकीत कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. गुरुवारी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे योगेश कदम यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, स्वारगेटला गेल्यावर मला लक्षात आले की त्या ठिकाणी प्रचंड रहदारी आहे. नेहमी वर्दळ असणारी ती जागा आहे. त्या ठिकाणी आमच्या बहिणीवर अत्याचार होत असताना कोणी त्या बहिणीला वाचवण्यासाठी का गेले नाही? हा प्रश्न मला पडला. तो प्रश्न मी पोलिसांना विचारला. त्यावेळी पोलिसांनी दिलेले उत्तर मी माध्यमांना दिले.

योगेश कदम म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विरोधक विपर्यास करुन राजकारणासाठी वापर करत आहे. आमच्या सरकारची पॉलीसी महिलांच्या अत्याचाराबाबत झीरो टॉरलन्स आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे मी सांगितले. त्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच येत नाही. उलट आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा दोन दिवस अथक काम करत होती. त्यांना यश आले आहे. आता आरोपीवर कठोर कारवाई होईल, असे आमचे प्रयत्न आहे. मी माझा उद्देश स्पष्ट केला आहे. त्यावरुन कोणी राजकारण करु नये, असे योगेश कदम यांनी म्हटले