‘महावितरण’कडून हिंजवडी उपविभागाची निर्मिती, आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नांना यश

0
7

पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड आणि हिंजवडी एमआयडीसी या चार नवीन शाखा कार्यालयांच्या उभारणीचा निर्णय

दि . २८ ( पीसीबी ) – चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेच्या नागपूर अधिवेशनात उपस्थित केलेल्या औचित्य मुद्द्याला यश मिळाले असून, महावितरणकडून हिंजवडी उपविभागाच्या निर्मितीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्राहक सेवा सुधारण्यासह वीजपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे.

नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांनी महावितरण पुणे परिमंडलाच्या पिंपरी विभागांतर्गत सांगवी उपविभागाची पुनर्रचना करून हिंजवडी उपविभाग निर्माण करण्याची मागणी केली होती. ग्राहकांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध व्हाव्यात तसेच महसूल वाढीस चालना मिळावी यासाठी सांगवी उपविभागाचे पुनर्रचनासह पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड आणि हिंजवडी एमआयडीसी या चार नवीन शाखा कार्यालयांची उभारणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, अनियमित वीजबिले, वीज चोरी व रोहित्र चोरीसारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर होत्या. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच महावितरणच्या व्यवस्थापनात अधिक सुसूत्रता यावी, तांत्रिक व अतांत्रिक तक्रारींचे जलदगतीने निराकरण व्हावे यासाठी हिंजवडी उपविभाग निर्मितीची आवश्यकता होती. आमदार शंकर जगताप यांनी हा मुद्दा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला.

या पुनर्रचनेमुळे ग्राहक सेवा सुधारेल, वीज चोरीवर नियंत्रण मिळवता येईल, महसूल वाढीस चालना मिळेल आणि अचूक वीजबिले निर्माण होण्यास मदत होईल. महावितरणच्या प्रतिमेत सुधारणा होऊन ग्राहकांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करता येईल. सांगवी उपविभागाचे विभाजन करून हिंजवडी उपविभाग स्वतंत्र करण्यात आला असून सांगवी शाखा, ताथवडे शाखा आणि हिंजवडी शाखांचे पुनरुज्जीवन करून चार नवीन शाखा कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.

सांगवी उपविभागांतर्गत सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख आणि वाकड शाखा कार्यरत राहणार आहेत. नव्याने स्थापन होणाऱ्या हिंजवडी उपविभागांतर्गत ताथवडे, हिंजवडी आणि हिंजवडी एमआयडीसी शाखांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या उपविभागासाठी १२ नवीन पदे मंजूर करण्यात आली असून, ९५.०४ लाख वार्षिक निधी महावितरणकडून मंजूर करण्यात आला आहे. हिंजवडी उपविभागासाठी एकूण १.२४ कोटी रुपये वार्षिक खर्च मान्य करण्यात आला आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार शंकर जगताप म्हणाले, “चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अखंड आणि कार्यक्षम वीजपुरवठा मिळावा, तांत्रिक आणि अतांत्रिक तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत होतो. नागपूर अधिवेशनात हा मुद्दा मांडल्यानंतर महावितरणने तातडीने निर्णय घेतला. हिंजवडी उपविभाग निर्मितीमुळे ग्राहक सेवा अधिक सुटसुटीत आणि कार्यक्षम होईल. मी या निर्णयाबद्दल महावितरण प्रशासनाचे आभार मानतो.”

आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारामुळे आणि सततच्या प्रयत्नांमुळे हिंजवडी उपविभागाच्या निर्मितीस मान्यता मिळाली असून, या निर्णयामुळे चिंचवड मतदारसंघातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.