दि. २६ ( पीसीबी ) – कालिकत येथील नॅशनल इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या डीन पदी प्राध्यापक डॉक्टर ए. शैजा यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या वर्षी शैजा यांनी महत्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नथुराम गोडसे याचे कौतुक केल्याचा प्रकार समोर आला होता. आता त्यांची संस्थेच्या डीन पदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर संस्थेच्या आवारात वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाचे आता राजकीय पडसाद देखील उमटताना दिसत आहेत. डॉ. शैजा यांची डीन (नियोजन आणि विकास) म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी एप्रिलपासून संस्थेत आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
नेमकं काय झालं होतं?
डॉ. शैजा या सध्या एनआयटी कालिकत येथेली मेकानिकल इंजिनियरिंग विभागात प्राध्यापक आहेत. २०२४ च्या पुण्यतिथी दिवशी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी “भारताला वाचवल्याबद्दल गोडसेचा अभिमान आहे,” असे म्हटले होते. फेसबुकवर एका वकीलाने पोस्ट केली होती की, “हिंदू महासभेचा कार्यकर्ता नथुराम गोडसे, भारतातील अनेकांचा हिरो.”. या पोस्टवर शैजा यांनी संबंधीत कमेंट केली होती.
शैजा यांनी नंतर ती कमेंट डिलीट केली, परंतु त्याचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली होती. केरळमधील कोझिकोड शहर पोलिसांनी शैजा यांच्याविरोधात आयपीसी कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याबरोबरच डाव्या विचारसरणीच्या अनेक संस्था आणि काँग्रेसने त्यांची संस्थेतून हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती.
तेव्हा शैजा या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हणाल्या होत्या की, “माझी कमेंट ही गांधीजींच्या हत्येसाठी कौतुक करण्याकरिता नव्हती. माझा तसं करण्याचा कसलाही विचार नाही. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हे गोडसे यांचे पुस्तक मी वाचले होते. गोडसे हे देखील एक स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या पुस्तकात बरीच माहिती आणि खुलासे आहेत, जे सामान्य माणसाला माहित नाहीत. गोडसेने त्याच्या पुस्तकात आपल्याला माहिती दिला आहे. या पार्श्वभूमीवर मी वकिलाच्या फेसबुक पोस्टवर कमेंट केली होती. लोक त्या कमेंटचा वेगळा अर्थ काढत असल्याचे दिसून आल्यानंतर, मी कमेंट डिलीट केली. दरम्यान बुधवारी संपर्क साधण्यात आला असता डॉ. शेजा यांनी ताज्या घडामोडींवर कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.