प्राधिकरणात गंगा आरती, गंगाकलश स्नान होणार

0
4

निगडी,२४ – श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने निगडी प्राधिकरणातील श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक २४, लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे बुधवारी (२६ फेब्रुवारी) सायंकाळी ७:१५ वाजता गंगाआरती आणि रात्री ठीक ८ वाजता गंगाकलश स्नान या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र काशी विश्वेश्वर येथील विद्वान पंडित – महाराजांची विशेष उपस्थिती राहील. याशिवाय महाशिवरात्री २०२५ या महोत्सवात बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी पहाटे पाच वाजेपासून गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी पहाटे पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :-
पहाटे ५:३० वाजता रुद्राभिषेक, सकाळी ७:३० वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने स्वर गोविन्दम्, सकाळी ८ वाजता आरती, त्यानंतर सकाळी ९:३० ते ५ या वेळेत रक्तदान शिबिर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न होणार असून त्यादरम्यान दुपारी १२ वाजता पवनसुत भजनी मंडळ प्रस्तुत भक्तीभजन, दुपारी २:३० वाजता स्वामी प्रतिष्ठान भजनी मंडळ प्रस्तुत स्वरभजन, दुपारी ४ वाजता स्वयंभू रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ प्रस्तुत पंचपदीभजनसेवा सादर करतील. सायंकाळी ६:०० वाजता कलारंजनी संगीत विद्यालय सत्यम् शिवम् सुंदरा हा भावगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहे. त्यानंतर रात्री ८:१५ वाजता स्थानिक कलाकार भक्ती संगीतमाला सादर करतील. रात्री ११:०० वाजेपासून पहाटे ५:०० वाजेपर्यंत महाशिवरात्र जागरण करण्यात येणार असून चार प्रहर पूजेने महाशिवरात्री महोत्सवाचा समारोप करण्यात येईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे व ज्येष्ठांचा मानसपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी केले आहे.