पिंपरी, दि. 24 ( पीसीबी ) – शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ न्यूज १४ मिडीया आयोजित पिंपरी चिंचवड सन्मान सोहळा 2025, उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, उद्योजकता आणि आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले. पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
पुरस्कार वितरणावेळी बोलताना पद्मश्री मुरलीकांत पेटकर म्हणाले, “अशा पुरस्कार सोहळ्यांमुळे नवोदितांना प्रेरणा मिळते आणि आपल्या कार्यावर विश्वास वाढतो. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान नवी उमेद देतो.”
कार्यक्रमाचे आयोजक अविनाश कांबीकर यांनी मनोगत व्यक्त करत सोहळ्याविषयी बोलताना सांगितले की , “शहराच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांना मान्यता मिळावी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी आम्ही हा सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित करतो.” हे ह्या पुरस्कार सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे. ह्या वर्षी विविध क्षेत्रातील ११ मान्यवरांना पिंपरी चिंचवड सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यामध्ये साहित्यक्षेत्रातील पुरस्कार जेष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे यांना प्रदान करण्यात आला तर प्रविण तुपे यांना त्यांच्या प्रशासकीय सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल सन्माननीत करण्यात आले. तसेच बाधंकाम क्षेत्रातील उत्तुंग भरारी बद्दल बाधंकाम व्यावसायिक उदय कंट्रक्शन कंपनीचे संचालक मा. श्री. बाळासाहेब गायकवाड यांना पिंपरी चिंचवड सन्मान पुरस्कार देण्यात आला , आपल्या प्रतिपच्ंद्र या कांदबरी मुळे चर्चेत आलेले लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांना सन्माननीत करण्यात आले. निर्भीड पत्रकारितेमधून जनतेचे प्रश्न मांडणारे पत्रकार मा. श्री. मिलिंद कांबळे यांनाही पुरस्कार देण्यात आला. अगदी कमी वयात भारतीय खो- खो खेळाच्या भारतीय कॅप्टन असलेल्या कु. प्रियंका इंगळे यांनी ह्या वर्षी भारताला खो – खो खेळात जगज्जेता केले व पहिल्या खो – खो जागतिक स्पर्धेत भारताला विजय मिळवून दिल्या बद्द्ल पिंपरी चिंचवड सन्मान २०२५ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. आपल्या कौशल्यपुर्ण फोटोग्राफीमुळे तरुणांना मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध फोटोग्राफर मा. श्री. देवदत्त कशाळीकर यांना ही पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे VFX करुन पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक पटावर नेण्यात VFX प्रोड्युसर मा. श्री. पंकज सोनवणे ह्यांचा महत्वाचा वाटा आहे , ते SM Rolling FX कंपनीच्या माध्यमातून काम करत असतात त्यांना ही पिंपरी चिंचवड सन्मान २०२५ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. वसंत गुजर यांना सन्मानित केले.
१९८३ पासून एका छोट्याशा जागेतून शिक्षणाची सुरवात करुन आज शहरातील नव्हे तर भारतातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या औद्योगिक शिक्षण संस्था ( ASM ) च्या संस्थापक, सचिव श्रीमती आशा पांचपांडे यांना शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्द्ल पिंपरी चिंचवड जीवन गौरव सन्मान २०२५ ने गौरविण्यात आले. तसेच यावेळी प्रमथमच एका सामाजिक संस्थेला पुरस्कार देण्यात आला इंडो अथलेटिक सोसायटी ही संस्था मागील काही वर्षा पासून सायकलिंगच्या माध्यामातून विविध सामाजिक उपक्रम राबविते त्याबद्द्ल सन्मानित करण्यात आले.
यावेळी अविनाश कांबीकर यांनी दिग्दर्शित केलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असलेला लघुपट सुलतान , या लघुपटाचे टिझर दाखवण्यात आले आणी सुलतान टीममधील कलाकार , सदस्य तानाजी साठे , अतूल लोखंडे, गणेश देशमुख, सुजित सुरवसे, श्रीकांत गायकवाड, जान्हवी कांबीकर आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे, सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे, अभिनेते गणेश देशमुख, आणि ASM ग्रुपच्या आशा पाचपांडे यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.
यावेळी पुरस्कार विजेत्यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, “अशा सन्मानामुळे आमच्या कार्याची दखल घेतली जाते. यामुळे समाजासाठी अधिक समर्पितपणे काम करण्याची ऊर्जा मिळते.”
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले तर तानाजी साठे आणि शिवाजी घोडे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, विजेते, आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. विवाज इव्हेंट्स आणि सुलतान टीम यांनी सोहळ्याची भव्य सजावट आणि व्यवस्थापन उत्कृष्टपणे पार पाडले.
या सोहळ्याने शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला एक नवीन उंची दिली, असे मान्यवरांनी सांगितले. तसेच अनेक पत्रकार , सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.