दि. 21 (पीसीबी) – धनंजय मुंडे यांच्या भानगडींची जत्रा जनतेसमोर मांडणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांचीच आता कसोटी लागणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे महेबुब इब्राहिम शेख यांनी त्यांच्या आमदारकीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे. गेले तीन महिने सुरेश धस हे माध्यमांतून झळकत आहेत.
या याचिकेत सुरेश धस यांनी निवडणुकीत धार्मिक कारणांचा आधार घेत मतं मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, मतदानाच्या दिवशी व्हिडिओ व्हायरल करून, शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान घडवून आणल्याचा दावाही करण्यात आला आहे.
याचिकेत पुढे म्हटले आहे की, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मागणी करूनदेखील ‘फॉर्म 17C’ ची प्रत मिळाली नाही. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणीही फेटाळण्यात आल्याचा दावा आहे.
याचिकेद्वारे असा आरोप करण्यात आला आहे की, निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवाराला झुकतं माप दिलं. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सुरेश धस यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे. पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे.
फक्त सुरेश धसच नाही, तर मंत्री धनंजय मुंडे यांनाही औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठाने नोटीस पाठवली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांनी शपथपत्रात काही महत्त्वाची माहिती दडवली असल्याचा आरोप झाला होता. त्यावर न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी काही दिवसांपूर्वी नोटीस पाठवण्याचे आदेश दिले होते.