छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात रमले विद्यार्थी!

0
9
  • पिंपरी दि. २३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध शाळेतील पाच हजार विद्यार्थ्यांनी शिवसृष्टी थीम पार्कला दिली भेट शिवनेरी, राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड ते विशालगड अशा ऐतिहासिक किल्यांची मिळणारी माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र ऐकण्याची संधी, शिवराज्याभिषेकाचे लिखित स्वरूपातील वर्णन मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळाली. निमित्त होते महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थी व शिक्षकांची ‘शिवसृष्टी’ थीम पार्कला आयोजित केलेल्या भेटीचे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सहजरित्या जाणून घेता यावा, यासाठी महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची शिवसृष्टी थीम पार्कला भेट देण्याचा उपक्रम महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हाती घेतला होता. या उपक्रमाचा तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शिवसृष्टी थीम पार्कला भेट देत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचा शासनकाल, विविध किल्ल्यांचा इतिहास, शिवकालीन हत्यारे, युद्धातील रणकौशल्ये आदींबाबत विद्यार्थ्यांना माहिती विविध प्रतिकृती, थ्री डी शो, प्रदर्शन, माहितीपट याद्वारे मिळाली.

पुस्तकात वाचलेला इतिहास समजला सोप्या पद्धतीने

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा इतिहास आतापर्यंत पुस्तकामध्ये वाचला होता. परंतु शिवसृष्टी थीम पार्कला भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध कौशल्य, गड-किल्ल्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, हे सर्व अधिक सोप्या पद्धतीने समजून घेता आले आहे, अशा भावना शिवसृष्टी थीम पार्कला भेट दिलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांची शिवसृष्टी थीम पार्कला भेट देण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. ही भेट विद्यार्थ्यांना इतिहासाची जाण होण्यासोबतच शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.

  • प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

शिवसृष्टी पार्क येथे भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेण्यास मदत झाली. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक शैक्षणिक उपक्रमाचा भाग न राहता त्यांच्या पुढील आयुष्यात देखील त्यांना संघर्ष आणि नेतृत्वाची शिकवण देणारा ठरू शकेल.

  • विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आतापर्यंत विद्यार्थ्यांनी पुस्तकामध्ये वाचला होता. परंतु शिवसृष्टी थीम पार्कमध्ये विद्यार्थ्यांना हा इतिहास नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सोप्या पद्धतीने शिकण्याची संधी मिळाली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असा ठरला आहे.

  • रजनी आहेर, शिक्षिका, रहाटणी कन्या शाळा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका