वाकड, दि. ४ – वाकड येथील एका इमारती मधील दोन शॉप बँकेकडून स्वस्तात खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी मिळून एका व्यावसायिकाची फसवणूक केली. हा प्रकार २ एप्रिल २०१७ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला.
प्रवीण रामचंद्र देवकर (वय ४२, रा. वाकड) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास लक्ष्मण पन्हाळकर,, तेजस विलास पन्हाळकर आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी देवकर यांना कस्पटे वस्ती वाकड येथील एका इमारती मधील दोन शॉप बँकेकडून स्वस्तात खरेदी करून देतो असे सांगितले. त्यासाठी बनावट सेल सर्टिफिकेट तयार करून दिले. तेजस पन्हाळकर याच्या लग्नासाठी देवकर यांच्याकडून दागिने बनवून घेतले. तसेच एक जमीन डेव्हलप केल्यास त्यातील ठराविक बांधकाम देवकर यांना देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण ७६ लाख १८ हजार ८०० रुपये घेतले. त्यांनी पैसे अथवा ठरल्याप्रमाणे प्रॉपर्टी नावावर करून देण्याची मागणी केली असता त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.