श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे ब्रम्हांड उर्जेचे साधन आहे…हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर

0
3

जगद्गुरु संत तुकोबारायांची जन्मभूमी, कर्मभूमी असणारा हा संपूर्ण परिसर अतिशय पवित्र, पावन असा असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे ब्रम्हांड उर्जेचे साधन आहे असे प्रतिपादन हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे केले. श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर सुरु असलेल्या ‘अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याच्या’ निमित्ताने ‘संत तुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती’ हा हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचा संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित चिंतनाचा कार्यक्रम या सप्ताहात आयोजित करण्यात आला असून त्या निमित्ताने हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर बोलत होते. हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी उपस्थित श्रोत्यांना आपल्या अमोघ अशा रसाळ वाणीतून प्रबोधन करीत पुढे सांगितले की संत, महात्मा कुठेही जन्माला येत नाहीत. पवित्र ते कुळ पावन तो देश | तेथे हरीचे दास जन्म घेती || पावनकुळातच संत जन्माला येतात, अवतार घेतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांचा परिणाम दगडांवर देखील झाला. आजही म्हातारी माणसे या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरती महाराजांच्या दर्शनासाठी येत असताना या डोंगराची माती आपल्या कपाळाला लावतात आणि धन्यता मानतात. संत आपल्या जीवन आचरणातून अनेक सामान्य जनांचे कल्याण करतात. संत तुकोबारायांनी आखून दिलेल्या परमार्थिक मार्गाने जीवन जगण्याची कृपा आपल्याला भाग्यानेच लाभत आहे. संसार हा डोक्यामध्ये ठेवायचा आणि परमार्थ अंत:करणामध्ये साठवायचा असे महाराजांनी आपल्या चिंतनातून नमूद केले. वसंत पंचमी हा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा जन्मदिवस. वसंतपंचमीच्या निमित्ताने पानेगावकर महाराजांनी तुकोबारायांचा पाळणा गीत गायले. तसेच यामध्ये उत्स्फूर्तरीत्या महिला श्रोत्यांनी साथ दिली. जन्मोत्सव संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व श्रोत्यांना सुंठवडा वाटण्यात आला.

पहाटेची काकड आरती, महापूजा संपन्न झाल्यानंतर हभप नाना महाराज तावरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाने अवीट, रसाळ वाणीतून गाथा पारायण दोन सत्रात संपन्न झाले. नंतर हरिपाठ होऊन रात्री आठ वाजता श्री क्षेत्र आळंदी येथील साधक आश्रमाचे प्रमुख, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक हभप यशोधन महाराज साखरे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाडा॥ बोलाविलें बोलें बोल। धनी विठ्ठल सन्निध॥ या अभंगातून हभप यशोधन महाराज साखरे यांनी आपल्या चिंतनातून संत तुकाराम महाराजांचे अवतार कार्य अनेक दृष्टांत देत सांगितले.