मुंबई दि. २४ (पीसीबी) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे सांगतानाच निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
गुरुवारी नांदेड जिल्हयातील नायगाव मतदारसंघातील सुमारे ५० गावातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.
शिबीरामध्ये जनमानसात प्रतिमा चांगली असेल असा विचार मांडला होता त्यानुसारच पक्षात नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नांदेड जिल्हयात आणि शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य पक्षाकडून आणि सरकारकडून केले जाईल असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सर्व घटकातील लोक कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेला चांगले यश मिळाले आहे. जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे आता आपली जबाबदारी त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
पक्षाचे कार्यकर्ते कामात हालते ठेवले पाहिजे त्यापध्दतीने पक्षाकडून कामाचे स्वरूप तयार केले जाणार आहे. तसे कार्यक्रमही दिले जाणार आहे. आम्ही फक्त राजकारणच करत नाही तर सर्व घटकांच्या काय समस्या आहेत हेही जाणून घेत असतो हेही आवर्जून अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना तुम्हाला आगीतून फोफाटयात पडल्याची भावना कधीही येऊ देणार नाही असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.
अजितपर्व पुढे नेताना भविष्याचा वेध घ्यायचा आहे – सुनिल तटकरे
तुम्ही ज्या ताकदीने आजm पक्षप्रवेश करत आहात त्याने आमच्या पक्षाची ताकद अजून वाढणार असून आता आपल्याला अजितपर्व पुढे नेताना भविष्याचा वेध घ्यायचा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांना सांगितले.
आज तुम्ही प्रवेश केलात त्याने नक्कीच पक्षाला फायदा होणार आहे. पक्षाची ताकद अजून कशी वाढेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांना ताकद देऊन उभे करायचे आहे हे सांगतानाच प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे सुनिल तटकरे यांनी पक्षात स्वागत केले.
नांदेड जिल्हयात क्रियाशील सभासद नोंदणी कराल असा विश्वास व्यक्त करतानाच तुमच्या पाठीशी पक्षाची ताकद उभी केली जाईल असे आश्वासन सुनिल तटकरे यांनी दिले.
नांदेड जिल्हयातील नायगाव – धर्माबाद मतदारसंघातील ५० गावातील पदाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांच्यासह सुमारे अडीचशे पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रवेश केला.
या पक्ष प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रीस नायकवडी, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.











































