दि. 23 (पीसीबी) – आज दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. दोन गट झाले. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे गटाचा मेळावा अंधेरीत तर एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसीवर होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बदलेली राजकीय स्थिती पाहता उद्धव ठाकरे गटाला गळती लागली आहे. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. राज्यभरातील ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणवुकीचे निकाल जाहीर झाले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे फक्त 20 आमदार निवडून आले. त्यानंतर भविष्यातील शिवसेनेची दिशा काय असेल ते स्पष्ट झालं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ओघ वाढला. असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सोप्या नसतील. काही गोष्टींवरुन ते दिसू लागलय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी जाहिरात दिली आहे. त्यावरुन धाराशिव जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
जाहिरातीमध्ये धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह गायब असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान आहे. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान लावल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी अनेक दैनिकात अभिवादनाच्या जाहिरती दिल्या आहेत.
तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. त्यांच्या काही वक्तव्यांवरुन वादही निर्माण झाला होता. आता देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्रीपद मिळवण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला. पण यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे.