आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडली, आयसीयुमध्ये दाखल

0
10

दि. 23 (पीसीबी) – बीडच्या मस्साजोग येथील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याच्या पोटात दुखायला लागल्यामुळे त्याला काल रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रात्री एक वाजता आणण्यात आले . तेथेच त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती नाजूक असल्याने त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान याच वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
वाल्मिक कराड याची सोनोग्राफी करण्यात आली तसेच त्याची मधुमेहाची तपासणी झाली. त्याचं ब्लड प्रेशरही चेक करण्यात आलं. काल रात्री 11.45 च्या सुमारास त्याला बीड कारागृहातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
बीडच्या मस्साजोग येथील खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्याला 14 तारखेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याचे वकील अशोक कवडे यांनी त्याच दिवशी कराडच्या जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सरकारी पक्ष आणि तपास अधिकाराचे उत्तर मागवले होते. आता याच प्रकरणी आज केज जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र त्याच्यावर मकोका लागल्याने त्याला जामीन मिळण्याची शक्यता कमीच आहे. मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस तरी आरोपीला जामीन मिळत नाही. त्यामुळे किमान पुढचे सहा महिने वाल्मिक कराडला जेलमध्येच रहावं लागण्याची शक्यता दिसत आहे.