– आता भोसरीचे बलाढ्य युवानेते रवी लांडगे यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – विधानसभा निवडणूक काळात ठाकरेंच्या शिवसेनेला भरते आले होते मात्र, दारूण पराभवानंतर ओहटी सुरू झाली आहे. महापालिकेत पाच वर्षे सत्ताधारी नेते असलेल्या भाजपच्या एकनाथ पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेना सोडली. आता पाठोपाठ रावेत परिसरातील ताकदिचे नेते मोरेश्वर भोडंवे यांनीही अवघ्या तीनच महिन्यांत शिवसेनेला जयमहाराष्ट्र केला आणि पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आहे. दरम्यान, सत्तेच्या अपेक्षेने भाजप सोडून शिवसेनेत आलेले आणखी काही नेते, पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
मोरेश्वर भोंडवे हे रावेत परिसरातून दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. रावेत, वाल्हेकरवाडी परिसरात त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. भोडवे हे ज्या पक्षात जातील ते पॅनल या भागातून विजयी होणार अशी परिस्थिती असल्याने त्यांच्या भूमिकेला महत्वा आहे. विधानसभा निवडणूक काळात भोंडवे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळावी म्हणून नोव्हेंबर २०२४ मध्ये अगदी वाजतगाजत मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रत्यक्षात त्यांना संधी मिळाली नाही. युतीच्या जागा वाटपात ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेली आणि ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेल्या राहुल कलाटे यांना तिथे उमेदवारी मिळाली. तेव्हापासून भोंडवे हे नाराज होते.
रावेत परिसरात त्यांनी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले असून त्या फलकावर भोंडवे यांनी आमचे नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत फोटो टाकला आहे. भोडवे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, मी सुरवातीपासून अजितदादांच्या बरोबर होतो आणि आहे. पुन्हा प्रवेश करण्याची किंवा तशी घोषणा करण्याची गरज मला वाटत नाही. दुसरे म्हणजे शिवसेनेचा जय महाराष्ट्र ही मराठी माणसाचा आहे.
रवी लांडगे काय करणार ?
एकनाथ पवार, मोरेश्वर भोंडवे यांच्यासारखे बडे नेते शिवसेना सोडून स्वगृही परतले. आता भोसरी मधून आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात दंड थोपटून उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणारे माजी नगरसेवक रवी लांडगे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत रवी लांडगे यांना विचारणा केली असता, आपण अद्याप असा कोणताही निर्णय घेतलेले नाही मात्र, महापालिका निवडणूक नव्या दमाने लढवणार असे स्पष्ट केले.