ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन

0
6

आळंदी दि.21 (पीसीबी)-
संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. सोमवारी रात्री उशिरा पुण्यातील चिंचवड येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने डॉ. किसन महाराज साखरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. डॉ. किसन महाराज साखरे यांच्या पश्चात कन्या यमुना कंकाळ, पुत्र यशोधन साखरे आणि चिदंबरेश्वर साखरे असा परिवार आहे. आळंदी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

साखरे महाराज यांनी आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहिले होते. तसेच, आळंदी , देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते. याशिवाय, ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्रत त्यांनी प्रकाशित केली होती.
डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने संत साहित्याचा एक गाढा अभ्यासक हरपला आहे.