प्रगत अमेरिकेने तृतीयपंथियांना नाकारले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिलाच निर्णय

0
5

दि.21 (पीसीबी)तृतीयपंथींचे अधिकार हा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेसह जगभरातला चर्चेचा मुद्दा ठरला आहे. यासाठी अनेक देशांमध्ये तृतीयपंथींकडून आंदोलनंदेखील करण्यात आली आहेत. खुद्द अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात तृतीयपंथींची रद्द केलेली मान्यता जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदी येताच क्रांतिकारी निर्णय म्हणत पुन्हा सुरू केली होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आपल्या कार्यकाळाची सुरुवात करतानाच काही महत्त्वाचे व जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होणारे निर्णय घेतले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वातून अमेरिका बाहेर पडत असल्याच्या शासकीय आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्याचबरोबर कॅनडा व मेक्सिको या दोन देशांवर अतिरिक्त आयात शुल्क आकारण्यांचादेखील निर्णय त्यांनी जाहीर केला. याचबरोबर सध्या चर्चेत आलेला डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय म्हणजे अमेरिकेत आता तृतीयपंथींना शासकीय मान्यता असणार नाही. लवकरच ट्रम्प प्रशासनाकडून यासंदर्भातल्या शासकीय आदेशावर स्वाक्षरी केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात ट्रम्प यांनी यासंदर्भात उल्लेखदेखील केला आहे.

“आजपासून युनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिकेत फक्त स्त्री व पुरुष या दोनच गटांना मान्यता असेल. अमेरिकन सरकारची ही अधिकृत भूमिका असेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. क्रीडा प्रकारांमध्ये तृतीयपंथींच्या समावेशाचा मुद्दा गेल्या काही काळात चर्चेत आला होता. यंदाच्या ऑलिम्पिकमध्येदेखील काही महिला कुस्तीपटूंनी यासंदर्भात तक्रार केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेण्याआधी काढलेल्या रॅलीवेळी याबाबत भाष्य केलं होतं.

“सर्व पुरुषांना महिलांच्या क्रीडाप्रकारांपासून लांब ठेवा”, असं म्हणतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील निर्णयांबाबत सूतोवाच दिले होते. यासंदर्भत इतरही काही निर्णय येत्या काळात अपेक्षित असल्याचं डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातदेखील अशाच प्रकारचे निर्णय घेतले होते. त्यानुसार, अमेरिकन लष्करात तृतीयपंथींना रुजू करून घेण्याची प्रक्रिया त्यांनी थांबवली होती. यावेळी या नव्या निर्णयाच्या अध्यादेशावर सही झाल्यानंतर सर्व प्रकारच्या शासकीय कागदपत्रांवर संबंधित व्यक्तीची ओळख म्हणून फक्त स्त्री व पुरुष हे दोनच रकाने असतील.