शरद पवार यांचा आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादी अधिवशनाला, राजकारणात मोठी खळबळ

0
4

शिर्डी, दि. 18 (पीसीबी)
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पक्षातील आणखी एक मोठा नेता त्यांची साथ सोडणार आहे. विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीमध्ये होत असलेल्या अधिवेशनाला हजेरी लावली आहे. सतीश चव्हाण यांची विधानपरिषदेची आमदारकी रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधीमंडळाला दिलेले पत्र पक्षाने माघारी घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधीमंडळाला दिलेल्या पत्रामुळे सतीश चव्हाण यांचा पक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार सतीश चव्हाण आज (18 जानेवारी) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण अजित पवारांना सोडून शरद पवार यांच्यासोबत गेले होते. त्यावेळी आमदार सतीश चव्हाण यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. राष्ट्रवादीने हे निलंबन मागे घेतले असून अजित पवार शनिवारी पुन्हा पक्षात प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पक्षविरोधी भूमिका घेतल्याने सतीश चव्हाण यांना 15 ऑक्टोबर 2024 रोजी पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. सतीश चव्हाण यांनी 13 जानेवारी 2025 रोजी NCP (SP) च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे ध्येय आणि धोरण यावर विश्वास व्यक्त करत प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत त्यांचे 6 वर्षांचे निलंबन मागे घेण्यात येत आहे.

कोण आहेत सतीश चव्हाण?
सतीश भानुदासराव चव्हाण हे मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे पदवीधर आहेत. 1977 पासून त्यांनी दिवंगत वसंतराव काळे यांच्यासोबत विविध चळवळींमध्ये काम केले. 1984 पासून ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. 2008 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या ते विधान परिषदेच्या न्यायनिर्णय समितीचे सदस्य, सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाचे सदस्य आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कार्यकारिणी सदस्य आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संघटनेचे ते सरचिटणीसही आहेत.