सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट, राजकीय वर्तुळात खळबळ

0
121

दि. 17 (पीसीबी) – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यातच अचानक बदल केला आहे. या बदलामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता असून, राजकीय हस्तक्षेप (Political Interference) होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मस्साजोग ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने आणि निषेध मोर्चे काढण्यात आले होते. या दबावानंतर, वाल्मीक कराडवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, आता सीआयडीमध्ये (CID) अचानक मोठा बदल करण्यात आला आहे.

तपास अधिकारी बदलला

या प्रकरणाचा तपास सुरुवातीला सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर  करत होते. मात्र, आता त्यांच्या जागी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून तपासाधिकारी अचानक बदलण्यात आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सुदर्शन घुले गँगचा लीडर, वाल्मिक कराड सदस्य

या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह नऊ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. सीआयडीने सुदर्शन घुलेला गँगचा लीडर  दाखवले आहे, तर वाल्मीक कराडला गँगचा सदस्य म्हटले आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध सीआयडी घेत आहे. त्यामुळे, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तपासाधिकाऱ्यात अचानक बदल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा बदल म्हणजे तपासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्षपातीपणे (Impartial) तपास व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.