माजी महापौर तात्या कदम यांचे निधन

0
10

 पिंपरी, दि.१७ –  पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर कृष्णा शंकरराव तथा तात्या कदम (वय – ८०) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. नगरपालिका स्थापन झाली तेव्हा पासून ते आकुर्डी येथून नगरसेवक होते.  कृष्णा कदम हे तात्या कदम नावाने ओळखले जात होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना १९८६ साली झाली. पहिल्याच निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. शहराचे तिसरे महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जात. शहराच्या राजकारणात आणि महापालिका वर्तुळात त्यांचा दबदबा होता. काही काळ शिवसेनेत होते.   गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता कात्रज स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  तात्या कदम हे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अशोक कदम यांचे बंधू तर पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मंगला कदम यांचे दीर होत.