सैफअली खानचा हल्लेखोर सापडला

0
4

मुंबई, दि. 16 (पीसीबी) : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याला आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निगरानी ठेवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या व्यक्तीला कुठून आणि कसं ताब्यात घेतलं याबाबत सध्या कुठलीही माहिती नाही.

पोलीस या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला वांद्रे पोलीस ठाण्यात आणणार असल्याची माहिती आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत असून आरोपीला अटकेत घेतल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरटा हा चोरीच्या उद्देशानेच सैफ अली खानच्या घरात शिरला होता. तो लोकलने वांद्रे येथे आला. त्यानंतर त्याने सैफ अली खानच्या इमारती जवळच्या दुसऱ्या इमारतीवरुन उडी घेत सतगुरु शरण इमारतीत प्रवेश घेतला. त्याने मागच्या गेटने प्रवेश केल्याची माहिती आहे. तर, सैफ अली खानच्या घरापर्यंत जाण्यासाठी त्याने इमारतीच्या इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केल्याची माहिती आहे.

पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात अनेक पुरावे सापडले आहेत. त्याआधारे पोलिसांनी या आरोपीचं लोकेशनही ट्रेस केल्याची माहिती आहे. हा चोरटा मुंबईतील प्रभादेवी या भागात राहत असल्याची माहिती आहे. त्यानुसार, पोलिसांनी तपास करत चोरट्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.