देहूरोड,दि. 16 (पीसीबी)
एक्सपायरी डेट उलटून गेलेले कुरकुरे खाल्ल्याने एका व्यक्तीला जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला. हे प्रकरण मिटविण्यासाठी व तक्रार न करण्यासाठी दुकानदाराकडून अडीच लाख रुपये घेतले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 13 जानेवारी आणि 14 जानेवारी रोजी तळवडे येथे घडली.
भूषण पंढरीनाथ पाटील (वय 27), राहुल सुभाष पाटील (वय 22), सुभाष चंपालाल पाटील (वय 51, तिघे रा. तळवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी किराणा दुकानदार रमेशकुमार लालाराम चौधरी (वय 37, रा. तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांच्या किराणा दुकानातून नेलेले कुरकुरे खाल्ल्यामुळे राहुल पाटील यांना उलटी आणि जुलाब असा त्रास झाला. त्यामुळे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना बोलावून चौधरी यांचे दुकान बंद करण्याची धमकी दिली. तसेच चौधरी यांना शिवीगाळ करून हे प्रकरण मिटवण्यासाठी सुरुवातीला 50 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून अडीच लाख रुपये घेतले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.