शेकापचे पाटील कुटुंब भाजपच्या वाटेवर

0
13

अलिबाग, दि. 14 (पीसीबी) – रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष फूटीच्या उंबरठ्यावर असून, पाटील कुटूंबातील एक गट भाजपच्या वाटेवर आहे. शेकापचे माजी जिल्हा चिटणीस आणि मिनाक्षी पाटील यांचे चिंरजीव आस्वाद पाटील यांच्यासह अनेक मोठे नेते येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, अलिबाग, पनवेल परिसरातील शेकापचे अस्तित्वालाच मोठा धक्का पोहचणार आहे.

मिनाक्षी पाटील यांच्या निधनानंतर पाटील कुटूंबातील वाद विकोपाला गेले. पंढरपूर येथील शेकापच्या अधिवेशनात या वादाची ठिणगी पडली. पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या नियुक्तीवरून सुभाष पाटील यांनी पक्षातील मनमानी कारभागाबाबत पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत सुभाष पाटील यांना अलिबाग मधून उमेदवारी नाकारण्यात आली. जिल्हा चिटणीस यांनाही उमेदवारी देतांना डावलण्यात आले. घरच्यांचाविरोध डावलून जयंत पाटील यांनी सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला. शेकापच्या चारही उमेदवारांचा रायगड जिल्ह्यात पराभव झाला.

जिल्हा चिटणीस पदाची धुरा संभाळणारे आस्वाद पाटील, माजी आमदार सुभाष पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील निवडणूक प्रचारापासून दूर राहीले. त्यामुळे चित्रलेखा पाटील यांना शेकापच्या बालेकिल्ल्यात अपेक्षित मते मिळाली नाही. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची साथ मिळूनही चित्रलेखा पाटील यांचा शिवसेना शिंदे गटाच्या महेंद्र दळवी यांनी जवळपास तीस हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.

निवडणूकीनंतर आस्वाद पाटील यांनी आपल्या पाठीराख्यांना एकत्र करत जिल्हा चिटणीस पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शेकाप मध्ये फूट पडणार असल्याचे निश्चित झाले होते. यानंतर त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन शेकापमधील त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. सतत विरोधीपक्षात राहण्यापेक्षा सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेणे गरजेचे असल्याची भूमिका मांडली.

शेकापचे माजी आमदार आणि भाजपचे राज्यसभेतील विद्यमान खासदार धैर्यशील पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लवकरच ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये दाखल होणार आहेत. शिर्डीयेथील भाजपच्या अधिवेशनात आस्वाद पाटील यांच्या सह मोजक्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होईल अशी अपेक्षा होती. मात्र आपला पक्षप्रवेश सोहळा अलिबाग मध्येच व्हावा अशी इच्छा आस्वाद पाटील यांनी व्यक्त केली . त्यामुळे आता अलिबाग येथे लवकरच त्यांचा आणि त्यांच्या सहकार्ऱ्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यांला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे नवनियुक्त कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थित राहणार असल्याचे भाजपच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदावर वर्णी लागल्यानंतर आस्वाद पाटील यांनी त्यांना शुभेच्छां देणारे बॅनर लावले आहेत त्याच बरोबर समाज माध्यमांवरही पोस्ट टाकून चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे. माजी आमदार सुभाष पाटील यांचे चिंरजीव सवाई पाटील आणि सुमना पाटील यांनीही चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.