शिवसेनेला मोठा धक्का, संघटक एकनाथ पवार भाजपच्या वाटेवर

0
12

– विधानसभा पराभव खटकला, अवघ्या तीनच महिन्यांत कंटाळले
पिंपरी, दि. 14 (पीसीबी)   – ठाकरेंच्या शिवसेनेची उलटगणती सुरू झाली आहे. रोज नवनवे धक्के बसत आहेत. आठवड्यापूर्वी पुणे महापालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून सरळ भाजपमध्ये प्रवेश केला. पुणे शहरापाठोपाठ मुंबई, ठाणे, नाशिक शहरातूनही शिवसेनेला गळती लागली आहे. आता उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरातसुध्दा शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महापालिकेत सत्ता असताना सत्ताधारी नेते म्हणून पाच वर्षे कारकिर्द गाजवलेले भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी पक्षाचा राजीनामा देत वाजतगाजत शिवसेनेते प्रवेश केला होता. लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभेला पराभव झाल्याने नाराज झालेल्या पवार हे अवघ्या साडेतीन महिन्यांत शिवसेनेला कंटाळले असून ते आता स्वगृही म्हणजे भाजपमध्ये परतण्याच्या मानस्थितीत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून गेली तीस वर्षे एकनाथ पवार यांची खास ओळख आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी भाजपचा शहरात विस्तार केला आणि संघटना मजबूत केली. दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्या बरोबरीने शहरात भाजपची पाळेमुळे खोलवर रुजवली. २००९ मध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या विरोधात भाजपची उमेदवारी केली आणि पहिल्याच झटक्यात सुमारे ५० हजारावर मते मिळवली होती. युती नसल्याने शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांनी अपक्ष विलास लांडे यांचा अवघ्या १२०० मतांनी पराभव केला होता. नंतरच्या काळात पुन्हा भोसरीतून ते इच्छुक होते मात्र, त्यांनी संधी मिळाली नाही.
२०१७ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणण्यात एकनाथ पवार यांचा पुढाकार होता. सत्तेचे जुगाड तयार करून अवघ्या तीन नगरसेवकांची क्षमता असणारा भाजप ७७ जागांपर्यंत पोहचला आणि महापालिकेत सत्ता आली होती. निष्ठावंत गटापैकी एक अभ्यासू, आक्रमक चेहरा तसेच फर्डा वक्ता म्हणून पहिल्याच वर्षी एकनाथ पवार यांनी सत्ताधारी नेता पदावर संधी मिळाली. पाच वर्षे त्यांनी कामाच्या माध्यमातून सत्ता गाजवली. पुढे आमदारकी लढायची होती पण, भोसरीतून महेश लांडगे यांच्या जागेवर उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. आपल्या गावाकडे नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघात दोन-तीन त्यांनी मतदारसंघाची बांधनी केली. २०२४ च्या निवडणुकित त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली पण, त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. ठाकरेंच्या शिवसेनेलाही पुढचे भवितव्य उरले नाही म्हणून आता पवार हे पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत.
शिवसेना सोडणार आहेत की नाही याबाबत अद्याप एकनाथ पवार स्पष्ट बोललेले नाहीत. मात्र, आपण नाराज असल्याचे त्यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना प्रत्यक्ष भेटून कानावर घातले आहे. स्वतः राऊत यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला मात्र, महापालिका निवडणूक तीन महिन्यांवर असल्याने पवार हे पुन्हा स्वगृही परतण्याच्या मनस्थितीत आहेत. प्राधिकरणातील यमुनानगर, शाहुनगर प्रभागात एकनाथ पवार यांचे बऱ्यापैकी वर्चस्व कायम आहे. याच प्रभागातून पुन्हा नव्या दमाने निवडणूक लढविण्याचा मनोदय पवार यांनी व्यक्त केला आहे.