मस्साजोग सरपंच प्रकरणात शरद पवार यांचा फडणवीसांना फोन

0
4

– राजकारणात काही मतभेद असतील-नसतील पण …

बीड, दि. १२ – मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद अवघ्या राज्यभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय होऊन राज्य शांत झालं पाहिजे, अशी सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. दिल्ली येथे पार पडणाऱ्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा स्वागताध्यक्ष म्हणून मराठी साहित्यकांशी संवाद साधताना शरद पवारांनी ही माहिती दिली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले, “गेले काही दिवस महाराष्ट्रात अस्वस्थ चित्र दिसतंय. माझे दिवसाचे ६-७ तास बीड कसं नॉर्मल करता येईल? परभणीचा विषय कसा सोडवता येईल? आणखीन कुठे काय करता येईल याबद्दल संवाद सुरू आहे. जिवाभावाने एकत्र राहणारी माणसं आज एकमेकांच्या शत्रुप्रमाणे वागत आहेत. काही गावांमध्ये एवढे दहशतीचं, भीतीचं वातावरण आहे. आजच मी इथे येण्याआधी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चाही झाली. राजकारणात काही मतभेद असतील-नसतील पण हे चित्र महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही. काही झालं तरी ऐक्य राखायचं. लोकांच्या मनातला विद्वेष जाईल कसा याची काळजी घ्यायची आणि ते काम करून एकटा-दुकटा करू शकत नाहीत. मुख्यमंत्री एकटे करू शकत नाही. सबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले तुमच्यासारखे जाणकार या प्रश्नावर एका विचाराने उभे राहतील आणि आपला विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची काळजी घेतील त्यावेळेस मला खात्री आहे महाराष्ट्र हा शांत होईल.”