पुणे, दि. ११ : प्रख्यात बांधकाम व्यावसायिक आणि सरकारी कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांच्या अपहरण आणि हत्येचा मुख्य सूत्रधार योगेश उर्फ बाबू किसन भामे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडण्यात यश मिळविले आहे. या अटकेमुळे 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या खळबळजनक प्रकरणात महत्त्वपूर्ण यश आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या भामे याला कोल्हापुरात पकडण्यात आले.
सिंहगड पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील पोळेकरवाडी येथे राहणारे विठ्ठल सखाराम पोळेकर (७०) यांचे १४ नोव्हेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आले होते. याच परिसरात राहणारा भामे याने पोळेकर यांच्याकडे २ कोटी रुपयांची मागणी केली होती . भामेने साथीदारांसह पोळेकर यांचे कारमधून अपहरण केले, त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक वार केले आणि त्यांच्या अवशेषांची खडकवासला धरणाच्या मागील भागात विल्हेवाट लावली होती.
पोलिसांनी यापूर्वी भामेचे दोन साथीदार शुभम पोपट सोनवणे (वय 24, रा. चिंचोली गुरव, अहिल्यानगर) आणि मिलिंद देविदास थोरात (वय 24, रा. बेळगाव, ता. अहिल्यानगर) यांना अटक केली आहे.
भामेला मात्र दोन महिने पकडण्यात यश आले.
तपासात भामेची कोल्हापुरात उपस्थिती असल्याचे समोर आले, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत घडामोडींचा खुलासा केला. पोलीस आता हत्येमागचा नेमका हेतू, भामेच्या फरार कारवाया आणि त्याला आश्रय देणाऱ्यांची किंवा आर्थिक मदत करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.
ज्या व्यक्तींनी भामेला आश्रय दिला किंवा आर्थिक मदत केली त्यांना या प्रकरणात सहआरोपी मानले जाईल, असे अधीक्षक देशमुख यांनी आवर्जून सांगितले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या समन्वयातून ही अटक करण्यात आली.
या पथकात स्थानिक गुन्हे शाखा आणि हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, अभिजित सावंत, संजय सुलनासे, रामदास बाबर, अतुल डेरे यांच्या पथकाने आरोपिंचा छडा लावला आणि त्यांच्या मुस्क्या आवळल्या.