महाविकास आघाडीत फुट, शिवसेना स्वबळावर लढणार

0
3
  • मुंबई पासून नागपूर पर्यंत सर्व महापालिकेत ठाकरेंचे उमेदवार

मुंबई, दि. ११ : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत लढून पानीपत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आता काय होईल ते होईल. एकदा आम्हाला स्वबळ आजमावून पाहायचंच आहे, असं शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये उद्धवसेना स्वबळावर लढणार आहे.
जागावाटपात बराच उशीर झाल्यानं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. जागावाटपात झालेल्या घोळाला काँग्रेस नेते नाना पटोले, शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत जबाबदार असल्याचा त्यांचा रोख होता. त्यावर भाष्य करताना राऊतांनी स्वबळाची घोषणा केली. आता काय व्हायचं ते होईल. पण आम्ही स्वबळावर लढू, असं राऊत यांनी जाहीर केलं.
‘मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला स्वबळ आजमवायचं आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्बळावर लढवणार आहोत. उद्धव ठाकरेंनी मला तसे संकेत दिले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर महापालिकेत आम्ही स्वबळावर लढू. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हा परिषदा, ग्राम पंयाचयीच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आणि आपालले पक्ष मजबूत करणार आहोत,’ अशी घोषणा राऊत यांनी केली.
स्वबळाची घोषणा करताना राऊत यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ‘वडेट्टीवार आता बोलत आहेत. तेदेखील जागावाटपाच्या बैठकांना असायचे. शिवसेना राज्यातील एक प्रमुख पक्ष आहे. आमच्यावर टीका होतेय. पण हरियाणात काँग्रेससोबत कोण होतं? तिकडे ते एकटेच होते. जागावाटपाचा घोळ नव्हता. मग तिकडे त्यांचा पराभव का झाला?,’ असा सवाल राऊत यांनी विचारला.