पिंपरी, दि. ९ : शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,अस्वच्छता करणे तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कचरा संकलनासाठी आवश्यक ती व्यवस्था न ठेवल्यामुळे महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत थेरगाव येथे ८ ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण ४ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच पिंपरी, काळेवाडी येथील अनधिकृत बांधकाम आणि पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.
‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आरोग्याधिकारी कुंडलिक दरवडे,मुख्य आरोग्य निरीक्षक शशिकांत मोरे, आरोग्य सहाय्यक प्रशांत गोठे, आरोग्य सहाय्यक सचिन उघाडे यांच्यासह विशाल यादव, राजू जगताप, सूर्यकांत चाबूकस्वार, अतिक्रमण विभाग व महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांद्वारे शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,अस्वच्छता करणे तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कचरा संकलनासाठी आवश्यक ती व्यवस्था न ठेवल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण विभागाद्वारे पिंपरी, काळेवाडी-पिंपरी पूल, संजय गांधी नगर, नवमहाराष्ट्र विद्यालयासमोरील परिसर, शिवदत्त नगर, पिंपरी रस्त्यालगतच्या फुटपाथवर झालेले अनधिकृत बांधकाम आणि पत्राशेड निष्कासित करण्यात आले. अतिक्रमण विभागातील उपअभियंता माने, कनिष्ठ अभियंता मोरे यांच्यासह धडक कारवाई पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ३ बीट निरीक्षक, १८ एम.एस.एफ जवान, २ पोलीस अधिकारी, १६ पोलीस कर्मचारी, ६ कंत्राटी मजूर कर्मचारी यांच्या उपस्थितीत तसेच १ जेसीबी, १ ट्रॅक्टर ब्रेकर या यंत्र सामग्रीचा वापर करून ही कारवाई करण्यात आली.