गाडी अंगावरून गेल्‍याने लहान मुलाचा मृत्‍यू

0
11

महाळुंगे, दि. 9 (पीसीबी)

रस्‍त्‍याच्‍या कडेला उभ्‍या असलेल्‍या एका नऊ वर्षीय मुलाच्‍या अंगावरून गाडी गेल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ७) सायंकाळी कुरूळी येथे घडली.

देवाशीश अशोक चावरे (वय ९, रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या मुलाचे नाव आहे. याबाबत त्‍याचे वडिल अशोक एकनाथ चावरे (वय ४७) यांनी बुधवारी (दि. ८) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अशोक लेलन्‍ड (एमएच १४ जीयू ९६०४) या गाडीवरील अज्ञात चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सव्‍वासहा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी हे मोई कुरूळी रस्‍त्‍यावरील किराणा मालाच्‍या दुकानात किराणा भरण्‍यासाठी गेले होते. त्‍यावेळी त्‍यांचा मुलगा देवाशीश हा रस्‍त्‍याच्‍या कडेला उभा होता. त्‍यावेळी भरधाव वेगात आलेल्‍या गाडीने देवाशीश याला धडक दिली. या अपघातात त्‍याच्‍या डोक्‍याला मार लागला. त्‍यास रुग्‍णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.