तुळजाभवानी माता मंदिरातील शिळांना तडे

0
11

तुळजापूर, दि. 9 (पीसीबी) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यातील काही शिळांना तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे हे मंदिर परिसराची पाहणी करत होते. त्यावेळी हा प्रकार समोर आला. डॉ. सचिन ओंबासे यांनी मंगळवारी पाहणी केली. या वेळी पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक जया वहाणे, वास्तू विशारद तेजस्विनी आफळे उपस्थित होते.
मंदिरात सध्या पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे सुरू आहेत. काही कामे नूतनीकरणाची आहेत. गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढल्यानंतर काही शिळांना तडे गेल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे तुळजाभवानी मातेच्या मंदिरासह शिखराला भविष्यात धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिळांना पडलेल्या या भेगा कुठपर्यंत आहेत? आणखी किती शिळांना भेगा असतील? यासाठी गाभाऱ्यातील दगड, शिळांचे थ्रीडी स्कॅनिंगसह स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

मंदिराची पाहणी करण्यासाठी आता पुरातत्व विभागातील तज्ज्ञांच्या पथकास पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुरातत्व विभागातील तज्ज्ञांच्या पथकाने दिलेला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे.