पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक

0
13

मुंबई दि. 9 (पीसीबी) : राज्यात एकीकडे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असून पंकजा मुंडे याही गप्प असल्याने त्यांनाही लक्ष्य केलं जात आहे. आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली असून दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. त्यामुळे, सध्या बीड आणि बीडमधील नेते केंद्रस्थानी आहेत. त्यातच, प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी देखील मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंवर () गंभीर आरोप केले आहेत. सारंगी महाजन यांनी यापूर्वी देखील मुंडे धनंजय मुंडेंवर जमीन हडपल्याचा आरोप केला होता. आता, आपल्या जमीनप्रकरणी सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मला खात्री दिली आहे, मी तुमचं काम करुन देईल, असे सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर म्हटले. तसेच, धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंवरही गंभीर आरोप केले आहेत.  

माझ्या भाच्याने म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या नोकरानेच आमची जागा हडप केली आहे. धनंजयला हे करायची गरज नाही, पण त्याच्या नोकराने बालाजी मुंडेने मला पनवेलनं बोलवलं आणि दीड एकरची जागा हडप केली. मला माझी जागा माहिती नव्हती, ते असं करतील हे मला माहिती नव्हतं. पण, मला गोड बोलून परळीत बोलवलं आणि ओलीस ठेवलं. त्यानंतर, रजिस्टार ऑफिसला नेलं आणि सह्या करुन फोटो काढत बाहेर काढून दिलं. त्यावेळी, दहशतीत आम्ही सह्या केल्या, आपले नातेवाईक असे नाहीत असंच आपल्याला वाटत असतं. मात्र, आता दहशत काय हे मला कळतंय, असा घटनाक्रम सांगत धनंजय मुंडेंनीच माझी जमीन हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे.   

मी केस देखील टाकली आहे, अंबेजोगाईला देखील तक्रार दिली आहे. मात्र, येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, सगळीकडून ताशेरे ओढले गेले, तेव्हा मला पोलिसांनी कागदपत्र दिले. विशेष म्हणजे रिसिव्ह कॉपी ठाण्याच्या घरी मिळाल्याचे सारंगी महाजन यांनी म्हटले. मला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की, न्याय मिळवून देतो. अजित पवार यांनी देखील खात्री दिली आहे, धनंजयला समोर आणत न्याय मिळून देतो सांगितल्याचंही सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीनंतर म्हटलं.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचे मी समर्थन करेल, दीड वर्षे मला प्रचंड त्रास दिला आहे. स्वत: भेटायचा नाही, स्वत:चीच जागा होती, असं दाखवत होता. चोराकडेच न्याय मागते आहे, असं वाटायला लागले. त्यामुळे, धनंजयची आमदारकी देखील रद्द करावी, त्याने जनतेत राहून काम करावं, माज कमी करावा, अशा शब्दात सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेच्या राजीनामा मागणीचे समर्थन केलं आहे. तसेच, पंकजा धुतल्या तांदळाची नाही, तिची देखील मुकसंमंती होती, असे म्हणत सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेंना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. माझ्याकडे मुंडे यांचे नातेवाईक म्हणून न पाहाता सर्वसामान्य नागरिक म्हणून पाहावं, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील यांच्याविरोधात लढायला बळ मिळेल, असे महाजन यांनी म्हटलं आहे.  

बीड जिल्ह्यात अधिकारी बदलावे

बीड जिल्ह्यात दुसऱ्या भागातील अधिकारी सरकारने ठेवावे, जेणे करुन अधिकारी त्याचं ऐकणार नाहीत. धनंजय मुंडे यांच्या घरी जिल्हाधिकारी जातो, रजिस्टार एसपी येतात असं मला त्यांचेच लोकं सांगतात. येथील जमीन त्यांच्याशिवाय विकल्या जात नाहीत, असेही त्यांनी सांगितले.  

साडे तीन कोटींची जमीन 21 लाखांत घेतली

साडेतीन कोटींची जमीन ही धमकी देऊन फक्त 21 लाखांना घेतली. परळीत बोलवून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. सही केल्याशिवाय परळीतून बाहेर जाऊ देणार नाही अशी धनंजय मुंडे यांच्या माणसांनी धमकीही दिल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. यामध्ये सारंगी महाजन यांनी वाल्मिक कराडचेही नाव घेतलं आहे.  या आरोपांमध्ये तथ्य असेल तर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते.