ठाकरे, पवारांना सोडून जाणारे रावणाचे वंशज

0
8

मुंबई,दि. 9 (पीसीबी)
अजितदादा पवार यांच्या गटातील नेते सुनील तटकरे यांनी हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटातील खासदारांना ‘बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला’ असा सल्ला दिला होता, अशा माहिती सूत्रांनी दिली होती. यामुळे राष्ट्रवादीमध्ये पुन्हा खळबळ माजली असून त्यावरून सुप्रिया सुळें यांच्यासह अनेक नेत्यांनी नाराजी वर्तवली होती. अजित पवारांपासून ते सुनील तटकरे, प्रफुल पटेल या सगळ्यांना आज जे काही मिळालं ते शरद पवार यांच्यामुळे मिळालं. त्यांची आजा बाजारात जी किंमत आहे, ती शरद पवार यांनी केली. जसं आमच्याकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत जे 40 चोर गेले, त्यांची किंमत ही शिवसेना, मा. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आहे. त्यामुळे ‘बाप आणि लेकीला सोडा, आमच्यासोबत या’ ही भाषा वापरणं अतिशय अमानुष आहे.

संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे, तेवढीच ही भाषा क्रूर आणि निर्घृण आहे. ज्या पितृतुल्य नेत्याने तुम्हाला या स्तरावर नेलं, पण तुम्ही बाप-लेकीला सोडा, ही भाषा वापरण्यापर्यंत , या स्तरापर्यंत येता हे गंभीर आहे. केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी तुम्ही ही पातळी गाठता, ते क्रूर आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटावर शरसंधान साधले. तटकरेंच्या विधानाचा समाचार घेत राऊतांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं.

अमित शहांना खुश करण्यासाठी मोगॅम्बोला खुश करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत , ज्या कठीण परिस्थितीत शरद पवार यांनी कष्ट करून 8 खासदार निवडून आणले , त्यातले काही लोक जर सोडून जात असतील तर ते रावणाचे वंशज आहेत, अशा शब्दांत राऊतांनी हल्ला चढवला. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल, कोणी पक्षातून फुटत असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्घृण-अमानुष असतील, अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.