पिंपरी चिंचवड मध्येही आरोपींना वाचवण्याचा बीड पॅटर्न*रिक्षा चालकाच्या आत्महत्येला कारणीभूत 2आरोपींना तात्काळ जामीन, दोन आरोपी अद्याप फरार

0
20

चिंचवड, दि. 8 (पीसीबी) – खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून राजू राजभर या तरुण रिक्षा चालकाने 3 जानेवारी रोजी आत्महत्या केली. जिवंत असताना सद्रक्षणाय ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या पोलिसांचे संरक्षण त्याला लाभले नाही. आणि आत्महत्या केल्यानंतरही राजभर याला न्याय मिळू शकत नाही. राजभर याच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गंभीर गुन्ह्याखाली अटक केलेल्या राजीव उर्फ गुड्डू वीरेंद्र कुमार आणि रजनी सिंह या दोन आरोपींना चार दिवसात जामीन मिळालाआहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने आरोपी फरार असण्याचे आणि अटक गुन्हेगारांना तात्काळ जामीन मिळण्याचा बीड पॅटर्न राजभर आत्महत्येच्या प्रकरणात पिंपरी चिंचवड मध्ये दिसून येत आहे.
आज रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार, पिंपरी चिंचवड विभाग प्रतिनिधी अशोक मिरगे, काशिनाथ शेलार अंगणवाडीच्या पिंपरी चिंचवडच्या नेत्या शैलजा चौधरी, हमाल पंचायतीचे चिंचवड मालधक्का प्रमुख महादेव तिपाले यांनी आज मयत राजू राजभर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राजभर यांचा मोठा मुलगा आणि आणि या धक्क्याने इस्पितळात दाखल केलेली त्यांची पत्नी व लहान मुलगी नुकतेच घरी आले होते. राजभर हे घरातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या जाण्याने कुटुंब उघडे पडले आहे. रिक्षा पंचायतीच्या वतीने त्यांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली.
त्यांच्याशी चर्चा करत असताना आणि घटनेचा प्रथम माहिती अहवाल, आरोपींना जामीन मिळाल्याचे कागद पाहिल्यानंतर राजू राजभर याच्या आत्महत्येचे गंभीर प्रकरण पोलीस प्रशासन असंवेदनशीलतेने आणि अर्थपूर्ण पद्धतीने हाताळत आहे असे स्पष्ट होत आहे.
राजू राजभर यांनी मृत्यूपूर्वी, आपल्यावर घेतलेल्या कर्जफेडीचा कसा दबाव आणला जात होता. आपल्याला व मुलीला मारून टाकण्याचे,उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. पैसे देऊनही व्याज मागण्याच्या बहाण्याने छळले जात होते. याबद्दल लेखी पत्र लिहिले आहे आणि तसा व्हिडिओही आत्महत्या करण्यापूर्वी तयार केला आहे. इतका ठोस पुरावा असतानाही राजभर याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपी पैकी महिला आरोपीला पोलीस कोठडी दिली गेली नाही. पुढे चार दिवसात तिला जामीनही मिळाला.तर पुरुष आरोपीला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला. आता हे दोन्ही आरोपी जामिनावर सुटले आहेत. इतर दोन आरोपी या संवेदनशील प्रकरणात अद्याप फरार आहेत. वास्तविक सदर गुन्ह्यात सत्र न्यायालयात आणि तेही दीर्घ काळानंतर जामीन मिळतो. मात्र या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने आपला अधिकार वापरून दोघांनाही जामीन दिला आहे. तो देत असताना पोलीस आणि सरकारी वकील यांनी जामीनाला ठामपणे विरोध करायला हवा होता तो उपलब्ध कागदपत्रांवर दिसत नाही.
या सर्वांसाठी आरोपीचे नातेवाईक मुक्तपणे पोलीस स्थानकात वावरत होते. पोलिसांशी हितगुज करत होते. मयताच्या नातेवाईकांना लालूच दाखवून केस दुबळी करण्याचा प्रयत्न चालला होता. असे या प्रकरणात बळी पडलेल्या रिक्षा चालकाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. रिक्षा पंचायत याविषयी राजू राजभर यांच्या कुटुंबीयांच्या मागे उभी आहे. पोलिसांनी तातडीने आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पावले उचलावीत. तसेच दोन फरार आरोपींना तात्काळ अटक करून पुढील तपासासाठी ताब्यात घ्यावे अशी मागणी पंचायत करत आहे. नजीकच्या काळात राजू राजभर याला न्याय न मिळाल्यास रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव व सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा पंचायत आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार व मार्गदर्शक मानव कांबळे यांनी दिला आहे.