मुंबई,दि .8 (पीसीबी)
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे आमदार सुरेश धस आणि चित्रा वाघ यांचे बोलविते धनी कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. विशेषत: अजित पवार यांच्या गटात भाजपच्या या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे. गेले काही दिवस आमदार धस हे दररोज मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करीत आहेत. देशमुख यांच्या हत्येचा कट मुंडे यांच्या बंगल्यावर शिजल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. आमदार धस यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दुसरीकडे, बीडमध्ये जाऊन मुंडे यांना लक्ष्य करणाऱ्या अंजली दमानिया यांच्या पाठीशी भाजपची मंडळी उभी असल्याचे चित्र निर्माण झाले. अंजली दमानिया यांना धमक्या देणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात कारवाई. करण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या महिला विभागाच्या अध्यक्षा व आमदार चित्रा वाघ यांनी पोलिसांना पत्र दिले. धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात त्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे.