दि .8 (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून एक लाखाहून जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्तांवर जप्ती कारवाईची धडक मोहिम सुरु करण्यात आली आहे. एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता तात्काळ जप्त करण्याचे आदेश संबधित विभागीय कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, करसंकलन विभागाने शुक्रवार, दिनांक ७ जानेवारीपर्यंत तब्बल ४१८ मालमत्ता जप्त केल्या असून, त्यांच्याकडे तब्बल ११ कोटी ३७ लाख २३ हजार १९८ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. मालमत्ता जप्ती कारवाईवेळी १५११ मालमत्तांनी आपल्या थकीत कराचा भरणा करुन, २६ कोटी ९२ लाख ७३ हजार ७४९ इतक्या कराचा भरणा केलेला आहे. थकबाकीदारांना वारंवार आवाहन करुन देखील कराचा भरणा केला नसेल अशा मालमत्तांवर जप्तीच्या कारवाईसाठी कठोर पाऊले उचलावीत असेही आदेश करसंकलन मुख्य कार्यालयाकडून विभागीय कार्यालयास देण्यात आले आहेत. शहरातील एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्यांमध्ये खासगी संस्था, खासगी महाविद्यालये व शाळा, हॉटेल, खासगी रुग्णालये, पेट्रोल पंप, औद्योगिक कारखाने, शोरुम, मंगल कार्यालय, बँक, मॉल, चित्रपटगृहे आदी आस्थापनांचा समावेश आहे. सदर थकबाकी असणाऱ्या आस्थापनांची यादी करसंकलन विभागाकडून तयार करण्यात आली असून, संबंधित विभागीय कार्यालयास कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे. याचबरोबर अशा मालमत्तांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिध्द केली जाणार आहे. त्याचबरोबर अशा थकबाकीदारांना आवाहन करण्यासाठी सदर आस्थापनांच्या बाहेर बँड पथकाकडून बँड वाजविण्यात येणार आहे. याबरोबर सदर मालमत्तांवर चालू स्थितीमध्ये सुध्दा जप्ती करण्याचे आदेश करसंकलन विभागाकडून देण्यात आले असून शहरामध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.
शहरातील थकबाकीदारांना वारंवार कर भरण्याचे आवाहन करण्यात आले असून एक लाखाहून जास्त रक्कम थकीत असणाऱ्या मालमत्तांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. शहरातील बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्ता प्राधान्याने जप्त करण्यात येत असून मालमत्ताधारकांनी आपल्या थकीत कराचा तात्काळ भरणा करुन जप्तीची कारवाई टाळावी.
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी-चिंचवड शहरातील मोठमोठी हॉटेल, मॉल, पेट्रोल पंप चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, औद्योगिक कारखाने, खासगी रुग्णालये,आदी. आस्थापनांची एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असल्यास अशा मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना संबंधित विभागीय कार्यालयांना दिल्या असून शहरामध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहे. सदर आस्थापनांनी आपला मालमत्ता कर भरल्याची खात्री करावी. वरील आस्थापना चालू स्थिती मध्ये अथवा बंद झाल्यास महानगरपालिका कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका मध्ये