छत्रपतींसारखा जिरेटोप डोक्यावर परिधान करण्यास नकार, देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव

0
33

आळंदी, दि. ४ (पीसीबी)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानाचा जिरेटोप परिधान करण्यास नकार देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त शिवभक्तांची मने जिंकली आहेत. मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार करण्यात आला होता. तेव्हा शिवभक्तांनी टीकेची राळ उठवली होती. मात्र, त्या टीकेतून धडा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिरोटोप हातात स्वीकारून डोक्यावर परिधान करण्यास नकार दिला. आळंदीतील संत संवाद कार्यक्रमातील त्यांच्या या कृतीने अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं.

आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या संत संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं. यावेळी बाबा स्वामीजी आणि भास्करगिरीजी महाराज यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. यावेळी त्यांचा शाल आणि मोराच्या पिसांचा हार घालून सन्मान करण्यात आला. तर जिरेटोप त्यांच्या डोक्यात परिधान करणार तेवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानेने नकार देत जिरेटोप हातात स्वीकारला. जिरेटोप डोक्यात घालण्यासाठी दोन्ही महाराजांनी विनंती केल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारण्यास नम्रतेपूर्वक नकार दिला अन् हातातच जिरेटोप स्वीकारला. त्यांच्या या कृतीचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी हा क्षण त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरूनही पोस्ट केला आहे. यात त्यांनी “जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळ्याला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे!”, असं म्हटलं. त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

दरम्यान, मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जिरेटोप घालून प्रफुल्ल पटेल यांनी सन्मान केला होता. मोदींनी वाराणसीमधून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ त्यांना जिरेटोप देण्यात आला होता. परंतु, या कृतीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचं म्हणत अनेकांनी टीका केली होती.