राष्ट्रवादी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीसुध्दा केला फडणवीस यांचे कैतुक

0
18

मुंबई, दि. ४ (पीसीबी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्याचा प्रकार ताजा असतानाच महाविकास आघाडीतील आणखी एका नेत्याने त्यांची प्रशंसा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फडणवीसांचा व्हिडिओ ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या एका कृत्याचं कौतुक केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट म्हणून देण्यात आलेला जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला, जिरेटोपास श्रद्धेने वंदन करुन योग्य सन्मान केला. ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह आहे. राजकीय मतभेद असले, तरी शिवशंभू विचारांचा पाईक म्हणून ही कृती मनाला भावणारी आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

संजय राऊतसुध्दा फिदा –
सामनाच्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आले होते. यावर संजय राऊत म्हणाले की यात जवळीक साधण्याचा प्रश्नच येत नाही. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट ही शिष्टाचार होती. गडचिरोलीत नक्षलवादामुळे सामान्य माणसांचे बळी गेले. सामनातून विरोधीपक्ष आणि सत्ताधारी यांच्यात सतत संवाद सुरु असतो. नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणून राज्याच्या हिताचे पाऊल उचलले असेल तर कौतुकच आहे, असेही राऊत म्हणाले होते.

सुप्रिया सुळेंकडूनही फडणवीसांची प्रशंसा
‘दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गडचिरोलीतील कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे घेऊन जात असून, हे सगळ्यांसाठी चांगले आहे. माओवाद असो की दहशतवाद, या विरोधात आपण सगळेच आहोत; तसेच राज्य सरकारला मोठा जनादेश मिळाला असला तरी सध्या एकच व्यक्ती पूर्ण शक्तीने काम करीत असून, ती व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे. ते सध्या मिशन मोडवर काम करीत असून, त्यांना शुभेच्छा आहेत,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांचे काल कौतुक केले होते.