भाजपचा स्वबळाचा नारा, अजितदादांचा गाशा गुंडाळणार? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
36

दि.03 (पीसीबी) – भाजप पिंपरी चिंचवड शहरात स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्वतंत्र लढणार असल्याचे सुतोवाच केले. महिन्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे शहरातील आमदार अमित गोरखे यांनीही तीच भाषा केली. भाजपचे दोन वरिष्ठ आणि दोन स्थानिक नेते स्वतंत्र लढण्याचा कानमंत्र आपल्य कार्यकर्त्यांना देतात. याचा सरळ सरळ अर्थ आहे की, अजितदादांनी आता या शहरातील त्यांचा बोऱ्या बिस्तरा गुंडाळायाचा. अजितदादा कोणाच्या बापाला घाबरत नाहीत, पण आता फडणवीस यांनी उठ म्हटले की उठतात आणि बस म्हटले की बसतात. मंत्रिमंडळातील सहभाग, खातेवाटपात एकवेळ शिंदे रुसले पण दादांनी पदरी पडले पवित्र केले हीच भूमिका कायम ठेवली. फडणवीस यांचा हा पवित्रा पाहिला तर, आगामी काळात पवार यांच्या नावाचा पुणे जिल्ह्याचा सात-बारा भाजपच्या नावावर होणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्व नगरपालिका, पंचायत समित्यांवरसुध्दा भाजपचा भगवा फडकणार. दादांना रा.स्व. संघाचे वावडे आहे ते नागपूर अधिवेशनात दिसले. दुसरीकडे सत्तेची चव चाखायची तर भाजपसुध्दा पाहिजे. फडणवीस बोलत नाहीत करून दाखवतात.

पिंपरी चिंचवड शहरात आज महेश लांडगे ६७ हजारांनी आणि शंकर जगताप हे लाखाच्या फरकाने विधानसभेचे आमदार झाले. अर्थात त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाटा होता. विधान परिषदेच्या उमा खापरे आणि आमित गोरखे या दोन आमदारांची ताकद मदतीला आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांना या शहराचे महत्व माहित असल्याने त्यांचे बारीक लक्ष आहे. २०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे परफेक्ट नियोजन आणि आमदार महेश लांडगे यांचे संघटन कैशल्यामुळे इथे दादा पवारांची निर्विवाद सत्ता ढासळली. एकट्या भाजपचे अवघे चार नगरसेवकांचे संख्याबळ होते, ते ७८ पर्यंत पोहचले. दादांच्या राष्ट्रवादीचे ८८ संख्याबळ होते ते ३६ पर्यंत घसरले. ठाकरेंची शिवसेने अवघ्या ९ मध्याच शांत झाली आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. आताच्या परिस्थितीत राष्ट्रवादी दुभंगली, शिवसेनेचा तुकडा पडला. विधानसभेला शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना रसातळाला गेली. पुढचे पाच वर्षे विरोधात नको म्हणून आताच अर्धेअधिक माजी नगरसेवक भाजपकडे तोंड करून बसलेत. विकास कामे व्हायला पाहिजे असतील तर दिल्ली, मुंबई प्रमाणे शहरातही भाजपच हवी, असा सर्वसाधारण मतप्रवाह आहे. वारे भाजपच्य दिशेने वाहत असल्याने दादांची राष्ट्रवादी सोडून साहेबांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या ४० माजी नगरसेवकांना समोर गडद अंधार दिसतोय. अजितदादांना कसे डावलले गेले याचे दर्शन झाल्याने दादा समर्थकसुध्दा भाजपकडे आस लावून बसलेत. ठाकरेंची शिवसेना आणि साहेबांची राष्ट्रवादी अजून विधानसभेच्या पराभवातून सावरलेली नाही. हे सगळे चित्र भाजपसाठी आशादायी आहे. सत्तेची जादू, मतदान यंत्राचा चमत्कार पाहिल्यावर विरोधक गर्भगळीत आहेत. महापालिका लढायची की नाही या मनस्थितीत दादांची राष्ट्रवादी आली आहे. म्हणूनच वाटते की उद्या मार्च-एप्रिल किंवा थेट २०२६ मध्ये निवडणुका झाल्या तरी भाजपची निर्विवाद सत्ता येऊ शकते.

भाजप, दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना मिळून लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढले. आता महापालिका स्वतंत्र लढणार. खरे तर, भाजपचे मुख्य लक्ष्य २०२९ आहे. आपला खुंटा त्यांना बळकट करायचा आहे. २०१४ च्या विधानसभेला ११४ नंतर २०१९ च्या निवडणुकित १०५ आणि आताच्या २०२४ ला १३२ जागा जिंकणाऱ्या भाजपचे ध्येय शतप्रतिशत भाजप आहे. तिथे अजितदादा किंवा शिंदे कुठेच नाहीत. मुंगीच्या पावलाने का होईना आज संपूर्ण महाराष्ट्र भाजपने काबिज केलाय. मोदींच्या आशिर्वादाने आणि अर्थात स्वतःच्या कर्तुत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चाणाक्ष्यपणे राजकारण करत आलेत. आरक्षणाच्या निमित्ताने मराठा लॉबी विरोधात गेली तरी ते कुठेही डगमगले नाहीत. मराठेतर घटक आणि ओबीसींची मोट बांधून त्यांनी सत्तेचा सोपान गाठला. आता पुढची पाच वर्षे त्यांचीच आहेत.

कार्यकर्त्यांची अक्षरशः कुत्तरओढ, फरफट –
अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी कुंकवाचा धनी म्हणून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. बनसोडे यांनी कधी ना संघटनेत लक्ष दिले ना कुठल्या प्रश्नात डोकावले. आजवर महापालिकेत कधीही एकसुध्दा नगरसेवक त्यांच्या समर्थकांच्या यादीत नव्हता. उद्या भाजप स्वतंत्र लढणार असेल तर राष्ट्रवादीची धुरा बनसोडे यांच्या खांद्यावर असणार. दिवंगत आमदार जगताप यांना कोणत्या प्रभागात कोण कार्यकर्ता, नगरसेवक किती ताकदिचा, त्याची दुखरी नस कोणती, आर्थिक क्षमता, नातेगोते याची कुंडली पाठ असायची. आमदार बनसोडे यांना यातले सगळेच अशक्यकोटितले आहे. अजितदादांची भाजपने केलेली कोंडी पाहून त्यांचे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी यांची पळापळ सुरू आहे. भाजपच्या विरोधात उभे रहायची हिंमत कोणात दिसत नाही. विधानसभेला २००० रुपये प्रमाणे पैसे वाटणारे आता त्यांची वेळ आल्यावर काय कऱणार हासुध्दा प्रश्न आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, दादांच्या राष्ट्रवादीला आमदार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली १२८ उमेदवार शोधुनही सापडणार नाहीत.
साहेबांची राष्ट्रवादी पराभूत मनस्थितीत –
विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला चिंचवड, पिंपरी आणि भोसरी मतदारसंघात पराभव होऊनही साधारणतः साडेतीन लाख मते मिळाली. आता भाजपच्या हत्तीबरोबर पुन्हा झुंज द्यायची कोणाचीही तयारी नाही. नैराश्याचे मळभ कायम आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील या नेत्यांची भाषण भाजपच्या पथ्यावर पडणारी असल्याने आता त्यांचे समर्थक पालिका लढून उगाच भाजपशी पंगा कशासाठी, अशा पराभूत मनस्थितीत आलेत. त्यांना उभारी द्यायला सव्वा महिन्यांत ना कोणी नेता आला ना कोणी आमदार.

ठाकरेंच्या शिवसेना भवनाला टाळे लागणार
शहरात गजानन बाबर आणि शिवाजी आढळराव पाटील हे दोन खासदार होते. नंतर श्रीरंग बारणे आणि आढळराव आले. आमदार गौतम चाबुकस्वार पिंपरीतून जिंकले होते. शिवसेनेचे संघटन, दुसरी-तिसरी फळीसुध्दा भक्कम होती. राजकारणातील एक दरारा कायम होता. आज इथे शिवसेनेला उंदिरसुध्दा घाबरत नाही, अशी गत आहे. नऊ नगरसेवक होते ते सैरभैर झाले. संघटनेचा अक्षरशः खुळखुळा झाला. आकुर्डीच्या शिवसेना भवनाला टाळे लागतील की काय, अशी केविलवाणी परिस्थिती आहे. बुडत्या जहाजात कोणी बसत नाही म्हणून महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला नको वाटते. आता महापालिकेला साहेबांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस मिळून एकत्र भाजपचा सामना करायचा तर तिघे मिळूनही १२८ उमेदवारसुध्दा मिळणे कठीण आहे. म्हणूनच म्हणावे लागते इथे भाजप स्वबळार असेल तरी लढणार आणि कदाचित जिंकणारसुध्दा. घोडे मैदान जवळ आहे.