सोलापूर, दि.03 (पीसीबी) : दत्त जयंतीपासून नाताळ, सलग शासकीय सुट्या, मार्गशीर्ष महिना आणि नववर्ष आरंभाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळांनी भाविकांसाठी अविरतपणे महाप्रसादाची सेवा बजावली आहे. गेल्या १५ दिवसांत सुमारे १५ लाख भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्यात आल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दिली.
अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराला लागून असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ३७ वर्षे अखंडपणे कार्यरत आहे. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या अधिपत्याखाली सेवा कार्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. विस्तारित महाप्रसादालयासह यात्री निवास, भक्त निवास आदी स्वरूपात श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी सेवासुविधा उपलब्ध असून या सेवाकार्याने प्रभावित होऊन गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रभावित होऊन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांना दोन अद्ययावत किमती मोटारी स्नेहापोटी दिल्या होत्या. त्यांच्या पश्चात मंगेशकर कुटुंबीयांनी अन्नछत्र मंडळाबरोबर जिव्हाळा जपला आहे. अन्नछत्र मंडळाने अलीकडे गोव्यातही सेवाविस्तार केला आहे.
अलीकडे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी दूरदूरच्या भागातून भाविक येतात. सलग शासकीय सुट्यांसह धार्मिक सण, उत्सवाच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये नेहमीच भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. गेल्या १५ दिवसांत दत्त जयंतीपासून नाताळ, मार्गशीर्ष महिना, नववर्ष आरंभ यामुळे असंख्य भाविक आले होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने या कालावधीत सुमारे १५ लाख भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिला आहे. याशिवा हजारो भाविकांना यात्रा निवास उपलब्ध करून दिल्याचे जन्मेंजयराजे भोसले यांनी सांगितले.












































