आळंदी, दि.02 (पीसीबी)
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. १) मध्यरात्री सव्वाबारा वाजता आळंदी येथे करण्यात आली.
डिग्या उर्फ दिगंबर विठ्ठल कदम (वय ३५, रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रामदास मेरगळ यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी नगर परिषदेच्या पार्किंग जवळ एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून डिग्या याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्तूल, एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी शस्त्र जप्त केले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.










































