आज राजकारणात वाल्मिकीचा वाल्ह्या, सावधान !!! थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
41

 दि. 31 (पीसीबी) – खून, खंडणी, अपहरणाच्या आरोपातील बीडचा वाल्मिक कराड. आजवर त्याच्यावर विविध प्रकारच्या २०-२५ गुन्ह्यांची नोंद असल्याचे आमदार सुरेश धस सांगतात. परिसरातील गोरगरिबांच्या शेकडो एकर जमिनी बळकावल्यात. प्रचंड दहशत असल्याने जिल्ह्यातील तमाम राजकीय मंडळी त्याला चळचळ कापतात. वाळू चोरी, परळी औष्णिक विज केंद्रातील राख चोरी, जमीन चोरी असे अनेक गुन्हे आहेत. ५०० हायवा ट्रक्सचे साम्राज्य. रोज किमान एक कोटी रुपये घरी नेल्याशिवाय झोपत नाही. जिल्ह्यात कोण जिल्हाधिकारी, कोण पोलिस अधिक्षक अथवा निरीक्षक पाहिजे ते तोच सांगतो आणि तसेच होते. परिणामी त्याला सर्व प्रशासन, पोलिस यंत्रणेचे पूर्ण संरक्षण मिळते. कोणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला गेला तर तो संपलाच समजा, इतकी दहशत. सर्वात कहर म्हणजे एक पोलिस आधिक्षक गायब असल्याचे समोर आले. पवन उर्जा कंपनीकडे दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातून मोठा वाद झाला, त्यातच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या शरिराचा भुगा होईस्तोवर मारले, त्यांचे लिंग कापले, डोळे जाळले गेले. या सगळ्या प्रकऱणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा दाट संशय सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांना आहे. कराड याचा खरा पाठिराखा मंत्री धनंजय मुंडे असल्याने राजकारण तापले. नागपूर अधिवेशनात देशमुख हत्याकांड गाजले. हत्याकाडांनंतर हाच कराड फरार होता. महाराष्ट्र पोलिसांनी जंगजंग पछाडले पण त्यांना तो सापडला नाही. अखेर त्याची शंभरावर बँक खाती सील केली, सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्या, महसूल खात्याकडून सर्व जमिनींचे रेकॉर्ड काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले. नाड्या आवळल्यावर तब्बल २५ दिवसांनी वाल्मिक कराड शरण आला. कराड याचे एक एक किस्से एकूण महाराष्ट्र हादरला. माध्यमांतून आलेल्या सुरस कथांनी आज दाऊद पेक्षाही वाल्मिक कराड हा मोठा झाला. दुर्दैव असे की या कराडचा गॉडफादर राज्याचा मंत्री धनंजय मुंडे आहे. गेली वीस वर्षे हा कराड थैमान घालतोय तो मुंडेंच्या जीवावर. विधीमंडळात आपल्या भाषणांतून लोकांना भूवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या खुर्चीखालीच किती मोठा अंधार आहे, ते समोर आले. मुंडेंचे गॉडफादर उपमुख्यमंत्री अजित पवार हे चक्क मूग गिळून बसलेत, हे आणखी तिसरे आश्चर्य. बीडचा बिहार झाला हे सर्वार्थाने पटते.


खरे तर, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राला वाल्मिक कराड सारखे बेडर, गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारणी कलंक आहेत. जर का ते दोषी नव्हते तर वीस दिवस फरार होण्याचे काहीच कारण नव्हते. खाई त्यालाच खवखव असते. भाजप आमदार धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षिरसागर यांनी प्रकरण विधीमंडळात आणि रस्त्यावरही लावून धरले. सर्व पक्षांच्या आमदारांनी मिळून मोर्चा काढला. जनमताचा रेटा निर्माण झाला म्हणून हा बदमाश वाल्मिक कराड शरण आला. आता या निमित्ताने घरगडी कराड बीड चा उपनगराध्यक्ष कसा झाला ते समोर आले. मुंडेंनी तीन बायका तर, कराडलाही दोन आहेत. सगळी कृष्णकृत्ये तपासात बाहेर येतील. कराड याच्या बरोबर धनंज मुंडे यांची होती नव्हती ती सगळी चव्हाट्यावर आली. खरे तर, देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ अशा भंपक मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होताच आगामी महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांचे बिगूल आठवडाभरात वाजणार आहे. तोवर हे सगळे वाचावरण निवळले पाहिजे अन्यथा जनक्षोभ उसळला तर सरकार पक्षाला धोका संभवतो. कदाचित त्यासाठीच कराड यांची शरणागती झाली असावी, असेही म्हणतात.
एका दहावी पास घरगड्याचा राजकारणी बनलेल्या भुक्कड माणसाने राज्याचे राजकारण ढवळून काढले. राज्य सरकारची कोंडी केली. भाजप आणि त्याच बरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादीची नाचक्की झाली. या गरमागरमीत निवडणुका लागल्या तर महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका हातातून जाण्याची भिती सरकार पक्षाला होती. आता सीआयडी तपास होईल. कदाचित हा वाल्मिक कराड निर्देषही सुटेल. प्रश्न असा आहे की, नेहमी स्वच्छ राजकारण, प्रशासनाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपला ही संगत चालतेच कशी. असंगाशी संग मृत्युशी गाठ, हे अत्यंत प्रचलित वाक्य आहे. अजित पवार यांची मजबुरी समजू शकते. मुळात त्यांच्या राष्ट्रवादीतही असे एकाचढ एक शेकडो वाल्मिक कराड आहेत. ज्याचा घडा भरला तो समोर येतो. मुळात भाजपला इतरांपेक्षा वेगळे राजकारण करायचे तर अशा वाल्मिक प्रवृत्तींना खड्यासारखे बाजुला केले पाहिजे. प्रत्यक्षात भाजपने अर्धे अधिक राजकारणी वाल्मिक प्रयोगशाळेत तयार झालेलेच आपल्या पदरी ठेवलेत. तिथेच देव, देश, धर्म या संघ संस्कारात वाढलेली भाजप नाहक बदनाम होते. वाल्मिक कराडचा देवाभाऊंनी फडशा पाडला आणि अशा वृत्तींचा कायमचा बंदोबस्त केला तर लोकच डोक्यावर घेतील. शंभरावर गुन्हे झाल्यावर प्रचंड तपश्चर्येनंतर कुठेतरी एका वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झालेत. आज कलियुगात वाल्मिकीचा वाल्या झाल्याचे दिसले.