सदस्य नोंदणीच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार

0
17

– भाजपचे संघटन पर्व नेमकं काय आहे?
मुंबई, दि. 30 (पीसीबी)
भाजप संघटन पर्वाचे महाराष्ट्र प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्याकडून आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली असून विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप सज्ज आहे. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला राज्यभरात प्रत्येकी 25 लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य देण्यात आले आहे. तर इतर आघाड्यांना प्रत्येकी 5 लाख, तर पक्षातील सेलना किमान 2 लाख सदस्य नोंदणीची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपचा विस्तार आणि 2029 मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडून नव्या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाची मूळ संघटना आणि इतर मोर्चा आणि पक्षातील सेलला पक्षाच्या वाढीसाठी सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले असून महिला मोर्चा युवा मोर्चा ओबीसी मोर्चा या मुख्य मोर्चांसह इतर सेल व आघाड्यांना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना भाजपशी जोडण्याचं लक्ष देण्यात आले. 1 जानेवारी ते 15 जानेवारी यादरम्यान होणाऱ्या संघटन पर्व या अभियानाच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना भाजपसोबत जोडण्याचं टार्गेट ठेवण्यात आले आहे. या दृष्टीने भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर संघटन पर्वाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून चव्हाण यांनी आजपासूनच या दृष्टीने कामाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

समस्या सोडवण्यासाठी आम्ही कट्टीबद्ध
दरम्यान, रवींद्र चव्हाण या बैठकीत म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित भारत सर्वांना बनवायचा आहे. महाराष्ट्र सुद्धा त्याचं दिशेने नेण्याचा दृष्टिकोन आहे. आपला सर्वांचा खारीचा वाटा त्यात असला पाहिजे. भाजपमध्ये राष्ट्रसेवेसाठी तरुण मित्रांचे मी स्वागत करतो. ज्या ज्या समस्या असतील त्या सर्व प्रतिनिधी म्हणून सोडवण्यासाठी आम्ही कट्टीबद्ध राहू, असे त्यांनी म्हटले.

ध्येय पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करणार
तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत रवींद्र चव्हाण म्हणाले की, गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कामाला सुरुवात झाली आहे. एक चांगलं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. प्राथमिक सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ध्येय पूर्ण करण्यासाठी सगळे एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.