अर्बन स्ट्रीट, सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्त्याची रुंदी कमी

0
36

पिंपरी, दि. 30 (पीसीबी)
पिंपरी चिंचवड शहरात अर्बन स्ट्रीट, सुशोभीकरणाच्या गोंडस नावाखाली रस्त्याची रुंदी कमी करून वाहतूक समस्यां व नागरिकांच्या जीवाला निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत कठोर भूमिका घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना त्याबाबतचे पत्र त्यांनी नुकतेच दिले.
पत्रकात ते म्हणतात, पिंपरी चिंचवड शहरातील जुना पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या १२.५० किलोमीटर अंतराच्या मार्गावर प्रशस्त ग्रेड सेपरेटर मार्ग आहे. हा सहा पदरी रस्ता आहे. चार पदरी काँक्रीटचा एक्सप्रेस आहे. चार पदरी सर्विस रस्ता आहे. दोन पदरी बीआरटीएस मार्ग आहे. रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहनांच्या ये-जा असून वाहनांना पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. नाईलास्तव वाहन चालकांना रस्ता पदपाथावर वाहने पार्क करावे लागत आहे. दापोडी ते पिंपरी रस्त्यावर मेट्रोचे पिल्लर आहेत. मेट्रो स्टेशन आहेत. त्यातच पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरू आहे. पार्किंग झोन तयार करून व अर्बनस्ट्रीट नुसार रस्ते विकसित करून वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी सद्यस्थितीत रस्त्यांची रुंदी आणखी कमी केली जात आहे.
पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते निगडी भक्ती शक्ती समुह शिल्पा चौकापर्यंत५.१६ किमी अंतराचे ४९ कोटी ८१ लाख ८ हजार३६२ रुपये खर्चाचे ठेकेदार निखिल कंट्रक्शन यांना हे काम दिले आहे. तर पिंपरी चौकातील डॉ‌. आंबेडकर पुतळा ते दापोडी हॅरीस पुल अंतर ६.५४ किमी. खर्च ९३ कोटी ७८ लाख ५२ हजार ४६० रु. खर्चाचे काम ठेकेदार कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि‌. यांना देण्यात आले आहे. ही कामे रात्रंदिवस घाई गडबडीत सुरू आहेत. एकूण रस्ता १०.५ मीटर आहे त्यात बीआरटीएस मार्ग ३.५ मीटर, सेवा रस्ता ७.५ मीटर, पार्किंग २मीटर, फुटपाथ २.०१ मीटर, सायकल ट्रॅक १.८०मीटर,०.५ मीटर झाडांचे शुशोभीकरण होणार आहे. जिथे जास्त जागा असेल तेथे नागरिकांना बसण्याची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे जुना पुणे मुंबई महामार्ग आता केवळ ७.५ मीटर राहणार आहे.

दापोडीतील चित्रपट गृहा शेजारील पदपथ नाही. कासारवाडी येथे दोन्ही बाजूस पदपथ नाही. नाशिक फाटा ते शंकरवाडी ते आयटी पार्क पर्यंत पदपथ अस्तित्वात नाही. निगडी टिळक चौकाच्या पुढील भागात तसेच निगडी गावठाण भागात पदपथ नाही. चिंचवड येथील आटो क्लस्टरकडे जाणाऱ्या मार्गावरील हनुमान मंदिर ते मोरवाडी चौकापर्यंत तसेच डॉ. आंबेडकर पुतळा ते खराडवाडी पर्यंत अरुंद पदपथ आहे. या मार्गावर पार्किंग झोन नाहीत. त्यामुळे वाहने पदपथ रस्त्यावर पार्क केली जातात. पिंपरी संत तुकाराम नगर नाशिक फाटा कासारवाडी फुगेवाडी दापोडी मेट्रो स्टेशन खाली पदपथावर वाहने पार्क केली जातात. त्यामुळे पादचारांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर चालावे लागते. अनेक ठिकाणी दुकाने विक्रेते व टपऱ्या अतिक्रमण झाल्याने पदपथ गायब होतात.
अर्बन स्ट्रीटच्या वरील डिझाईन नुसार ही सर्व कामे रात्रंदिवस खूप जोरात सुरू असून या कामासाठी तब्बल १५० रुपये खर्च केला जाणार आहे. प्रशस्त रस्त्याची रुंदी कमी करून पदपथ व सुशोभीकरण केले जात आहे. त्यात सर्विसरोड कमी झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. वाहती गंगा, घ्या हात धुवून या तत्त्वानुसार संबंधित विभागाचे अधिकारी हे सर्व प्रकल्प पिंपरी चिंचवड कर जनतेच्या जीविताशी खेळून त्यांच्या माथी मारत आहेत. काही अधिकाऱ्यांचा केवळ पैसे कमवण्यासाठी करदात्या नागरिकांचा विश्वास घात आहे.
या कामामुळे रुंद असणारे रस्ते पदपथ व सुशोभीकरणामुळे अरुंद होत आहेत. पुढच्या काळात हे रस्ते जेसीपीने मोकळे करावे लागणार आहेत. आज खर्च होणारे पैसे पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी बीआरटीएस वर कोट्यावधी रुपयाचा खर्च केला गेला मात्र ही बीआरटीएस शेवटची घटका मोजत आहे. यापूर्वी अर्बन स्ट्रीटचे केलेले रस्ते देखील अयशस्वी ठरले आहेत. शहराच्या अंतर्गत भागांमध्ये देखील अशाच प्रकारची कामे सुरू आहेत. पुढच्या काळात वाहतूक कोंडी व त्यातून होणारे लहान-मोठे अपघात याबाबत आपलीच मोठी जबाबदारी असणार आहे.त्यामुळे आपण मा. पोलीस आयुक्त, महाराष्ट्र शासन व महापालिका आयुक्त यांना हे काम थांबवण्याबाबत पत्र देऊन पुढील होणाऱ्या वाहतूक कोंडी व अपघातांची जबाबदारी घेण्याबाबत आपले स्पष्ट पत्र आपण तातडीने द्यावेत ही विनंती, असे पत्रात म्हटले आहे.