हायटेंशन तारेचा झटका लागल्याने पेंटर जखमी

0
34

चिंचवड, दि. २९
इमारतीवर पेंटिंगचे काम करत असताना हायटेंशन तारेचा झटका लागल्याने पेंटर गंभीर जखमी झाला. ही घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी गुरुद्वारा चौक, चिंचवड येथे घडली.

समशेर शब्बीर शेख (वय ४०) असे जखमी पेंटरचे नाव आहे. याप्रकरणी समशेर यांच्या पत्नीने २८ डिसेंबर रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण प्रभाकर चिंचवडे (रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समशेर शेख हे पेंटिंगचे काम करतात. ५ डिसेंबर रोजी ते गुरुद्वारा चौक, चिंचवड येथील किरण चिंचवडे यांच्या इमारतीला पेंट देण्याचे काम करत होते. इमारतीच्या छतावरून हायटेंशन वायर गेली आहे. त्यामुळे वायर खाली काम करताना वीज अपघाताचा धोका होण्याची शक्यता आहे. असे असताना किरण चिंचवडे याने समशेर यांना काम करताना विद्युत रोधक ग्लोज, बूट दिले नाहीत. तसेच हायटेंशन वायरची कल्पना देखील दिली नाही. त्यामुळे छतावर पेंटिंगचे काम करत असताना हायटेंशन वायरचा करंट लागून समशेर शेख गंभीर जखमी झाले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.