माझी शांतता ही माझी मुक समंती नाही – प्राजक्ता माळी

0
21

मुंबई, दि. २८ –
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्या व्यक्तव्याच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी ह्या महिला आयोगात जाणार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या विषयाच्या संदर्भात त्यांनी एक पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.

प्राजक्ता माळी म्हणाल्या, आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या व्यक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी प्रसारमाध्यमांच्या समोर आली आहे. माझी शांतता ही माझी मुक समंती नाही आहे. माझ्या सारख्या कलाकारांची ही हतबलता आहे. कुणीतरी रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो. त्यानंतर त्यातील काहीच शब्द धरून मीडिया हजारो व्हिडिओ बनवते. त्यातून चिखलफेक सुरू होते. त्यातून महिलांच्या अब्रू निघत राहते. त्यातून सगळ्यांचे मनोरंजन होते. हे सगळं होऊ नये म्हणून आतापर्यंत मी शांत बसण्याचा पर्याय निवडला. मी गटारात दगड फेकणणे योग्य समजले नाही.

प्राजक्ता पुढे म्हणाल्या, हा विषय धादांत खोटा आहे. एक सांस्कृतिक कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना काढलेला एक फोटोला धरून एवढी आवई उठावी याला मी प्रत्युत्तर का देवू? एखादी गोष्ट खोटी आहे. ती किती काळ टिकणार आहे? असा विचार करून मी शांत बसणे स्वीकारले. माझ्या जवळच्या लोकांनी मला पाठिंबा दिला. त्यांनी मला धीराने या सगळ्यांना सामोरे जायला प्रोत्साहन दिले. माझ्याकडे कधीही शंकेच्या दृष्टीने बघितले नाही. त्यामुळे माझ्या चारित्र्याबद्दल मला स्पष्टीकरण देण्याची गरज भासली नाही.

प्राजक्ता म्हणाल्या, मात्र एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा याबद्दल बोलतो तेव्हा मात्र ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी लागते. त्यामुळे मी तुम्हा सर्वांच्या समोर आली आहे. जर आमदार धस असे बोलले नसते तर तुमच्यासमोर मी आलेच नसते असे प्राजक्ता म्हणाली.

त्यानंतर बोलताना प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांना सवाल केला. प्राजक्ता म्हणाल्या, सुरेश धस हे राजकारणी आहेत. आम्ही कलाकार आहोत. राजकारणी आपसात जे आरोप प्रत्यारोप करतात. ते त्यांनी करत राहावे. मात्र यामध्ये कलाकारांना का खेचता. कलाकारांचा याच्याशी काय संबंध?