मस्साजोग सरपंच हत्या प्रकऱणात धनंजय मुंडेंची विकेट जाणार ?

0
19

बीड, दि.26 (पीसीबी)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच नाव आल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तो संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचा आरोप होतोय. बीड जिल्ह्यातील आमदार बोलताना जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवतं आहेत. “गुन्हेगार निकटवर्तीय आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, तीन-चार महिन्यात पूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा शपथ घ्या” अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. संभाव्य मोर्चामुळे मुंडे यांची विकेट जाणार अशी चर्चा आहे.

आता आमदार सुरेश धस यांनी सुद्धा अशीच मागणी केली आहे. “धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवार यांनी निर्णय घ्यावा. मी पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे. पावणे तीन तालुक्यापुरती आमची अक्कल आहे. तेवढं बोलतो. त्यापुढे आमची अक्कल नाही चालत. अजितदादांना आम्ही कोण सांगणार?” असं सुरेश धस म्हणाले. “फडणवीस यांच्याकडे जी मागणी करायची ती केली आहे. फडणवीस त्याबाबत सीरिअस आहेत. आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुंडेंबाबत निर्णय घ्यावा ना. आमच्या भाजपचा असतं, तर आम्ही सांगितलं असतं, नमस्ते लंडन करा म्हणून” असं सुरेश धस म्हणाले.

‘…तर लोक चपलाने हाणतील’
“यात कुणाला मी सोडणार नाही असं राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं तर कोण दबाव आणेल? बीडमध्ये यांच्यासाठी काम करणारे लोक आहेत. यांनीच त्या लोकांना बसवलं आहे. बसलेला एसबीचा पीआय आहे, त्या जागी दुसरा व्यक्ती काम करत आहे. नव्या एसपींना फोन केला होता. ते गडबडीत असतील. मी त्यांना उद्या भेटणार आहे. मी भाजपचा आहे. सत्ताधारी आहे. पण लोकांच्या प्रेशरबाहेर जाऊ शकत नाही. उद्या मोर्चाला नाही गेलो, तर लोक चपलाने हाणतील आम्हाला. तोंड बडवतील लोकं. काल परवाच मतं दिली आणि मोर्चाला येत नाही म्हणून लोक मारतील. त्यामुळे आम्हाला मोर्चात जावं लागणार आहे” असं सुरेश धस म्हणाले.

“बीडच्या दहशतीची सुरुवात संदीप दिघोळेच्या हत्येने झाली. फिर्यादी हेच, गुन्हा दाखल करणारे हेच, तोडपाणी करणारे हेच. हे खून पचवले म्हणून त्यांचं कार्यबाहुल्य वाढलं. पालकमंत्री झाले आणि अधिक कार्यक्षेत्र वाढलं. संदीप दिघोळेपासून हे प्रकरण सुरू आहे. काल जोगदंड नावाचा ऊसतोड कामगार आहे. परळीतील लोकांनी त्यांना कर्नाटकात जाऊन मारलं. डोक्यात दगड घालून मारलं जातं” असं सुरेश धस म्हणाले.