पिंपरी, दि.25 (पीसीबी)
गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून सव्वा तीन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 24) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास भाटनगर पिंपरी येथे करण्यात आली.
सनी धर्मासिंग माचरेकर (वय 19, भाट नगर पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सुमित सुरेश भट आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोलीस अंमलदार विजय दौंडकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटनगर येथे गांजा विक्रीसाठी एक तरुण आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सनी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन किलो 232 ग्रॅम गांजा, एक मोबाईल फोन आणि 990 रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख 72 हजार 590 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. सनी याने हा गांजा सुमित भट आणि एका महिलेकडून आणला असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे त्या दोघांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.