सराईत सोनसाखळी चोराला खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या

0
15

पोलिसांनी केली होती मोकाची कारवाई

दिघी, दि.25 (पीसीबी)

दिघी, पिंपरी, जेजुरी, सासवड येथे सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 24) शिरूर तालुक्यातील वडू बुद्रुक येथे करण्यात आली.

रोहित किशोर मैनावत उर्फ राजपूत (वय 21, रा. वडू बुद्रुक, ता. शिरूर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनसाखळी चोरी, मोका यांसारख्या गंभीर गुन्ह्यात मागील दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी रोहित राजपूत हा वडू बुद्रुक येथे आला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाला मंगळवारी (दि. 24) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वडू बुद्रुक गावात सापळा लावून रोहित याला ताब्यात घेतले.

आरोपी रोहित हा दिघी आणि पिंपरी पोलिस ठाण्यातील पाच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यावर जेजुरी आणि सासवड पोलीस ठाण्यात सन 2022 मध्ये सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करून दिघी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.