बीड,दि.25 (पीसीबी)
बीडच्या जनतेचा शासनावर आता विश्वास उरलेला नाही असं खासदार बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे. आवादा कंपनीने मस्साजोगला काम बंद केलं नाही. ६ डिसेंबर या दिवशी आरोपींनी मस्साजोगचं जे आवादा कंपनीचं ऑफिस आहे तिथे अधिकाऱ्यांवर हल्ला केला. तिथल्या वॉचमनलाही मारलं गेलं. संतोष देशमुख सरपंच होते. त्यांना या घटनेबाबत सांगण्यात आलं. सरपंच संतोष देशमुख यांनी गावातील व्यक्तीला मदत करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनाही मारहाण करण्यात आली. लोक मधे पडले, त्यांनी वाद सोडवला. सोनवणे नावाचा जो गार्ड होता त्याने जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून पोलिसात तक्रार करायले गेला. त्याला चार तास बसवून ठेवलं आणि थातुरमातुर तक्रार दाखल केली. सदर आरोपींना ९ तारखेला अटक दाखवून जामीन मंजूर केला. यासाठी ६ डिसेंबरला कुणाचा फोन आला होता? हे तपासणं गरजेचं आहे असं बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलं आहे.
पोलीस उप निरीक्षक या प्रकरणात निलंबित झाले आहेत. त्यांचा सहभाग तपासणं गरजेचं आहे. कारण पोलीसांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते आरोपींबरोबर दिसत आहेत. हे खंडणीचं प्रकरण आहे पण ते वेगळं कारण त्याचा देशमुख यांच्याशी काही संबंध नाही. ९ डिसेंबरला आरोपींना जामीन मिळाला. त्यानंतर पीएसआय पाटील त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे पाटील कटात सहभागी होते का? हा प्रश्न निर्माण होतो असं बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्यावर पाळत ठेवली गेली. त्यांना मारत बाहेर काढलं गेलं त्यानंतर त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर परत टाकळी फाट्यावर आणलं गेलं असं सांगितलं जातं आहे. पोलीस असं सांगत आहेत. मात्र त्या दिवशी साडेचारच्या सुमारास मला फोन आला होता की संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आहे. मी अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्या दिवशी संध्याकाळी साडेसहाला कळलं की संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. मला ऐकून प्रचंड धक्का बसला असंही सोनावणे यांनी म्हटलं आहे.
संतोष देशमुख १० वर्षांपासून राजकारणात आहे. उत्तम काम करणारा माणूस होता त्याला ठार करण्यात आलं. संतोष देशमुख यांची हत्या टॉर्चर करुन करण्यात आली आहे हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. शवविच्छेदन अहवाल आला त्यात ५६ वण आहेत. त्यात एकावर एक किती झाले असतील? याचा विचार केलेलाच बरा. डोळ्यांवर, पाठीवर, पोटावर हे वण आहेत. बरगड्या मोडल्या आहेत. त्याचा गुन्हा काय होता? त्याने गावातल्या वॉचमनला मदत केली ही त्याची एवढी मोठी चूक घडली का? जर पोलीस अधीक्षकांनी वेळीच गुन्हा नोंद केला असता तर कदाचित पुढे गोष्टी घडल्या नसत्या असंही सोनावणे यांनी म्हटलं आहे.












































