भरूच, दि.25 (पीसीबी) – जामिनावर बाहेर आलेल्या शैलेश राठोड या ३५ वर्षीय व्यक्तीने गुजरातमधील भरूच जिल्ह्यात एका ७० वर्षीय महिलेवर पुन्हा बलात्कार केला. या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणीच त्याला अटक झाली होती. दरम्यान,या प्रकरणी कोठेही वाच्यता न करण्याची धमकी या नराधमाने दिली होती. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
१८ महिन्यांपूर्वी या महिलेवर याच आरोपीने बलात्कार केला होता. याप्रकरणी त्याला अटक झाली होती. परंतु, त्याला आता जामिनावर सोडण्यात आले. जामिनावर सुटून आल्यानंतर या नराधमाने पुन्हा वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी महिलेने पुन्हा पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी आमोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे शाखा, विशेष ऑपरेशन पथक आणि पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.
भरूचमधील दुसरी घटना
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका स्थलांतरित मजुराच्या ११ वर्षीय मुलीवरही बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही घटनाही भरूच जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात एका ११ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिचा सोमवारी सायंकाळी सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. आठवड्याभरापासून ती मृत्यूशी झुंज देत होती.